मुंबई : फडणवीस सरकारच्या पहिल्या विधिमंडळ अधिवेशनास आजपासून (7 डिसेंबर) सुरुवात होत आहे. हे विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार असून यात शनिवारी आणि रविवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी तर सोमवारी (9 डिसेंबर) विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. शिंदे सरकारच्या कार्यकाळात विधानसभा अध्यक्षपद भूषविलेले भाजपाचे नेते, राहुल नार्वेकर यंदा कॅबिनेट मंत्रिपदासाठी लॉबिंग करत आहेत, अशी चर्चा आहे. तर या 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली, ते भाजपा नेते कालिदास कोळंबकर हे सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
नार्वेकरांची मंत्रिपदासाठी लॉबिंग ? : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानं अनेक आमदार, नेते मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यातच भाजपाचे सर्वाधिक 132 आमदार निवडून आल्यानं भाजपामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची संख्या वाढली आहे. शिंदे सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपद भूषविलेले भाजपाचे राहुल नार्वेकर यंदा विधानसभा अध्यक्षपद नाही. तर, कॅबिनेट मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग करताना दिसून येत आहेत. विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर येत आहे. परंतु, ते सुद्धा विधानसभा अध्यक्षपदाऐवजी मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
हंगामी अध्यक्ष कोळंबकरांना हवं मंत्रिपद : या तीन दिवसाच्या विशेष अधिवेशनासाठी कालिदास कोळंबकर यांना शुक्रवारी (6 डिसेंबर) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली. कालिदास कोळंबकर हे 9 वेळा विधानसभेवर निवडून आलेले सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. परंतु, अनेकदा त्यांची बोळवण केवळ विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष पदासाठी केली जाते. अशात त्यांची ज्येष्ठता बघता ते विधानसभा अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, "मी विधानसभा अध्यक्ष पदासाठी अजिबात इच्छुक नाही. मला जनतेत राहून जनतेची कामं करायची आहेत. यासाठी पक्षश्रेष्ठींनी माझी ज्येष्ठता बघून मला कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, ही माझी मनापासूनची इच्छा आहे."
श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मुख्य सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केली आहे. श्रीकर परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे अतिशय विश्वासू अधिकारी आहेत. यापूर्वी श्रीकर परदेशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव पदावर काम केलंय. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा परदेशी यांची आपल्या कार्यालयात मुख्य सचिव पदावर नेमणूक केली आहे.
हेही वाचा -
- मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' खात्यांवरून अडलंय घोडं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही हवीत 'ही' खाती
- महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपद?
- देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी वर्णी आम्हाला त्याचा फार..., संकटमोचक गिरीश महाजन काय म्हणाले?