ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात १८ मतदारसंघ आहेत. यातील 7 विधानसभा मतदासंघातील भाजपानं पहिल्या यादीत नावं जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली. या 7 जणांमध्ये प्रामुख्यानं रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, गणेश नाईक, संजय केळकर या भाजपाच्या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात भाजपा तिसऱ्या क्रमांकावर : राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपंच्यात, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, लोकसभा या निवडणुका पार पडल्या. यामध्ये ग्रामीण भागात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सर्वच ठिकाणी समान राजकीय ताकद दिसून आली. मात्र, ग्रामीण भागात भाजपा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्यानं भाजपाची राजकीय ताकद दिसून आली नाही, अशी चर्चा आहे.
मतदारसंघात होणार चुरशीची लढाई : दुसरीकडं लोकसभेत कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभामधून शिंदे गटाचेच नरेश मस्के हे खासदार म्हणून निवडून आले. तर भिवंडीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव करून दिल्ली गाठली. आता मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली. तीनवेळा विधानसभा गाठणाऱ्या किसन कथोरे, रवींद्र चव्हाण, महेश चौघुले यांच्यासह संजय केळकर, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, तर गोळीबार प्रकरणात तुरुंगात असलेले कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्यानं या मतदारसंघात चुरशीची लढाई निर्माण केली आहे.
कथोरे-पाटील राजकीय वैर : ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड मतदासंघातून किसन कथोरे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांचे कट्टर राजकीय वैरी कपिल पाटील यांच्या गोटात खळबळ उडाली. लोकसभेत कपिल पाटील यांचा पराभव झाल्यापासून कथोरे-पाटील यांच्यातील राजकीय वैर अधिकच वाढलं आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढत असल्यानं सहाजिक त्यांना कपिल पाटील यांचे समर्थन मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
तिरंगी लढत होणार : भिवंडी विधानसभामधूनही विद्यमान आमदार महेश चौघुले यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानं, याही मतदारसंघात कपिल पाटील त्यांचे पुतणे नगरसेवक सुमित पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, पक्ष श्रेष्टीने चौघुले यांच्याच नावाचा आग्रह धरल्यानं पाटील यांचे भाजपामधील राजकीय वजन कमी केल्याचं दिसून आलं. या मतदारसंघात मुस्लिम मतदार ५० टक्के असल्यानं काँग्रेस, एमआयएम पक्षातील उमेदवार उभे राहणार असल्यानं तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
काटे कि टक्कर होणार : रवींद्र चव्हाण यांना भाजपानं डोंबिवलीमधून भाजपाच्या बालेकिल्ल्यात चौथ्यांदा उमेदवारी दिली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचे खासमखास असलेले डोंबिवलीतील मात्तबर नेते दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंच्या गटात प्रवेश करून मशाल हाती घेत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामुळं यंदाची निवडणूक 'काटे कि टक्कर' होणार आहे. त्यामुळं मंत्री चव्हाण यांना आताची निवडणूक सोपी राहिली नसल्याचं लोकसभा निवडणुकीच्या मतांमधून दिसून आलंय.
गायकवाड विरुद्ध गायकवाड : कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या दालनातच शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. याच गुन्ह्यात गणपत गायकवाड हे फ्रेब्रुवारीपासून तळोजा जेलमध्ये बंद आहेत. मात्र तेव्हापासूनच त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी मतदारसंघात अनेक विकासकामांचा धडाका लावून मतदारांमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं दाखवून दिलं. मात्र, त्यांचे कट्टर राजकीय विरोधक गोळीबारातून बचावले. महेश गायकवाड यांनी त्यांच्यासमोर दोन दिवसांपूर्वीच अपक्ष लढणार असल्याचं जाहीर करून भाजपा-शिंदे गटात खळबळ उडवून दिली. त्यामुळं यंदाची निवडणूक गायकवाड विरुद्ध गायकवाड तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर होणाऱ्या उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर होणार आहे.
संजय केळकर मैदानात : ठाणे विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांनाही भाजपानं तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन मैदानात आणले आहे. या मतदारसंघात ठाकरे गट आणि मनसेकडून त्यांना तगडे आव्हान असणार आहे. तसेच बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना तर ऐरोलीमधून गणेश नाईक यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात विजय चौघुले हे प्रमुख दावेदार रिंगणात असल्यानं यंदाची निवडणूक रंगदार होणार आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक यांनी दोन दिवसापूर्वीच शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट घेऊन भाजपामध्ये राजकीय भूकंप घडविणार असल्याचं दाखवून दिलं असतानाच बंड शमविण्यासाठी त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा -