छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सत्ता समीकरणं गेल्या अडीच वर्षात खूप बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले. दोन प्रमुख पक्षातील फाटाफूट झाल्यावर मुळ पक्ष असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार चांगलेच अडचणीत सापडल्याचं बोललं गेलं. मात्र, दोन पक्षात मोठा फरक पाहायला मिळाला, तो म्हणजे शिवसेना पक्षातून फुटलेल्या चाळीस आमदारांपैकी एकही आमदार विधानसभेच्या तोंडावर परत आला नाही. तर दुसरीकडं शरद पवार यांनी आपले काही शिलेदार परत आणण्यात यश मिळवलं. "उद्धव ठाकरे यांच्या हेकेकोरीमुळं आम्ही परत गेलो नाही," अस मत शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. तर "गद्दारांना आता पक्षात स्थान असणार नाही," असा इशारा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदारांना दिला.
अडीच वर्षात दोन प्रमुख पक्ष फुटले : गेल्या अडीच वर्षात राज्यातील राजकारणात दोन मोठ्या घटना घडल्या. शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार घेऊन पक्ष फोडला आणि भाजपासोबत जात सत्ता स्थापन केली. अवघ्या काही महिन्यात राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत वेगळा गट स्थापन केला आणि एकनाथ शिंदे, भाजपा यांनी स्थापन केलेल्या सरकारमध्ये स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर न्यायालयाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह मिळवलं. तर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ हे चिन्ह मिळवलं. त्यामुळं मूळ पक्ष असणाऱ्या दोन्ही नेत्यांना आपला पक्ष आणि आमदार, खासदार गमवावे लागले.
ठाकरे गटात घरवापसी नाही : शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राज्यात राजकीय वादळ पाहायला मिळालं. आरोप-प्रत्यारोपांमुळं नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात एकनाथ शिंदे यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 40 ते 42 आमदारांना सोबत घेऊन मोठा उठाव केला. त्यानंतर गद्दार या शब्दाचा सर्वाधिक उपयोग ठाकरे गटाकडून करण्यात आला. '50 खोके एकदम ओके' या ओळीनं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर कुठल्याही फुटलेल्या गद्दार आमदाराला पक्षात स्थान नसेल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासह गटातील नेत्यांनी स्पष्ट केली. त्यामुळ गेलेला एकही आमदार परतला नाही. मात्र, यात उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्यामुळं हे आमदार आले नाहीत? की त्यांना परत आणण्यात ठाकरे अयशस्वी राहिले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीत अनेकांची घरवापसी : अजित पवार यांनी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला. इतकं नाही तर सत्ता देखील मिळवली. त्यानंतर अनेक जाहीर कार्यक्रमात शरद पवारांवर टीका करण्यात आली. आता मोठ्या पवारांचं राजकारण संपुष्टात येईल, असं वाटत असताना त्यांनी पुन्हा आपल्या नावाचा करिष्मा दाखवून दिला. लोकसभेत कमी जागा वाट्याला आल्या, मात्र त्यातही जास्त जागा निवडून आणण्यात त्यांना यश आलं. इतकंच नाही तर स्वतःचा बालेकिल्ला असलेला बारामती त्यांनी राखला आणि त्याच दरम्यान अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदारांनी घरवापसी केली. शरद पवार यांनी देखील मोठ्या दिलानं त्यांना परत घेतलं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील गेलेले अनेकजण परतीच्या मार्गावर असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं. त्यामुळं शरद पवार यांचं हे यश मानलं जात आहे.
हेकेखोरी असल्यानं परत जाणार नाही : "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत काम करताना विचारधारेचा मोठा फरक होता. बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला पक्ष यांच्या दावणीला बांधण्यात आला, म्हणून आम्ही विभक्त झालो. मात्र, राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्यानं ते बाजूला पडले, त्यात आता कोणाला एक नेता चांगला वाटतो, तर कोणाला दुसरा, त्यामुळं त्यातील काही लोक शरद पवार यांच्याकडे आले असतील. तर त्यांच्यात विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळावं, या आशेनं देखील काही लोक परत आले आहेत. मात्र, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांची हेकेखोरी वाढली होती, त्यात आदित्य ठाकरे हे स्वतःला राष्ट्रीय नेते समजू लागले. मोठी वाक्य बोलली म्हणजे नेता होता येत नाही आणि पुढे जाऊन यांनाच नेता म्हणायचं का? असा प्रश्न असल्यानं अनेकांनी परत जायला नकार दिला होता," असं स्पष्टीकरण शिवसेना शिंदे गट प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दिलं.
गद्दारांना स्थान नाहीच : "अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना शिवसेनेतील आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतल्यानं त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना व पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सुद्धा ही गद्दारी सहन झालेली नाही. एकवेळेस उद्धव ठाकरे हे त्यांना माफ करतील, परंतु ज्या प्रकारे त्यांनी अपमान करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवण्यासाठी भाग पाडलं, ते बघून आयुष्यात कदापिही गद्दार गटाला वापसीचा रस्ता मोकळा नाही. एकवेळेस हुकूमशाही दबावाखाली गेलेल्या शिवसैनिकांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्ही परत घेऊ. परंतु पक्षप्रमुख, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांची मागील अडीच वर्षांमध्ये कधीही गद्दारांना परत घेण्याची इच्छा झाली नाही आणि कोणत्याही परिस्थितीत आगामी काळात होणारही नाही," अशी भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
ठाकरे यांची भूमिका योग्य की पवारांची? : गेल्या अडीच वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली. मात्र, त्यानंतर शिंदे गटाकडं गेलेल्या 40 आमदारांपैकी एकही आमदार ठाकरेंकडं परत आला नाही. तर दुसरीकडं राष्ट्रवादीतून गेलेल्या आमदारांपैकी काही आमदारांनी घरवापसी केली. ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांमुळं हे आमदार परत आले नाही? की त्यांनाच आता या सर्वांना आपल्या पक्षात घेण्याची इच्छा नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, राजकारणात झालेलं बंड आणि त्यातून निघणारा मार्ग यात पवारांनी घेतलेली भूमिकेने गेलेले आमदार परत येत आहेत. जे पवारांना जमलं ते ठाकरे यांना का जमू शकलं नाही? असा प्रश्न मात्र अनेकांना पडला आहे.
हेही वाचा