वाशिम : शिवसेना उद्धव बाळाबाहेब ठाकरे पक्षाकडून बुधवारी (23 ऑक्टोबर) रात्री 65 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात वाशिम विधानसभा मतदार संघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, अद्यापही येथून महायुतीकडून कुठल्याच उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्यानं विद्यमान आमदार लखन मलिक यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार? याबाबत कमालीची उत्सुकता वाढली आहे.
- वाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी वाशिम विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटानं डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं उर्वरित कारंजा आणि रिसोड मतदार संघातून महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार, याकडं जिल्हावासियांचं लक्ष लागलंय.
- भाजपाकडून कोण? : वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. इथून लखन मलिक मतदारसंघाचं नेतृत्व करतात. मात्र, यावेळेस मलिक यांना डच्चू मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. असं असलं तरी, वाशिम, कारंजा आणि रिसोड येथून भाजपा कुणाला उमेदवारी देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी (श.प.) उमेदवारांची प्रतीक्षा : रिसोड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळं येथून विद्यमान आमदार अमित झनक यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर कारंजा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दावेदारी केली जात आहे. येथून कोणता उमेदवार देण्यात येईल याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
रिसोडमधून भाजपा की शिंदेंची शिवसेना : शिवसेना शिंदे गटानं जाहीर केलेल्या यादीत वाशिम जिल्ह्यातील एकाही मतदार संघाचा समावेश नाही. मागील अनेक दिवसांपासून रिसोड मतदार संघात मोर्चे बांधणी करत असलेल्या आमदार भावना गवळी यांनी या मतदार संघावर दावा केलाय. मात्र, असं असलं तरी शिंदे गटाकडून कुणाच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. त्यामुळं रिसोडमधून भाजपा की शिंदेंची शिवसेना हे अद्यापही अस्पष्ट आहे.
पक्षप्रवेश होताच तिसऱ्या दिवशी उमेदवारी : डॉ. सिद्धार्थ देवळे हे वंचितचे पश्चिम विदर्भ प्रमुख होते. परंतु, त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात होते. मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 20 ऑक्टोबर रोजी त्यांनी शिवबंधन बांधले. त्यानंतर लगेच 23 ऑक्टोबरला त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
2019 मध्ये झालेल्या लढती -
- लखन मलिक (भाजपा) : 66 हजार 159
- डॉ. सिद्धार्थ देवळे (वंचित) : 52 हजार 464
- नीलेश पेंढारकर (अपक्ष) : 45 हजार 407
- डॉ. रजनी राठोड (कॉंग्रेस) : 30 हजार
हेही वाचा -
- शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती
- ...अन् माझ्या पोटात गोळाच आला, उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
- मातोश्रीच्या अंगणातील मतदारसंघ परत मिळवण्यासाठी शिवसेनेची धडपड; वांद्रे पूर्व मतदारसंघात कोण मारणार बाजी?