पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) भाजपाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी (20 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. यातच भाजपानं पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यावरुन या मतदारसंघातून इच्छुक असलेले श्रीनाथ भिमाले नाराज असल्याचं बघायला मिळतंय. माध्यमांशी संवाद साधत असताना श्रीनाथ भिमाले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. तसंच दोन दिवसात याविषयी मोठा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळं भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उमेदवारी न मिळाल्यानं नाराज : विधानसभा निवडणुकीकरिता भाजपाकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांनादेखील पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. परंतु, याच मतदारसंघातून भाजपाचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून प्रचार सुरू केला असल्याचं भिमाले यांनी सांगितलं. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडं त्यांनी उमेदवारीची मागणीदेखील केली होती. परंतु, जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये श्रीनाथ भिमालेंना डावलून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आल्यानं ते नाराज झाले.
दोन दिवसात निर्णय घेणार : माधुरी मिसाळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर श्रीनाथ भिमाले आपल्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत एकत्र आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, "पक्षाच्या या निर्णयावर आम्ही नाराज आहोत. येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेणार आहे", असं भिमाले म्हणाले. या पार्श्वभूमीवर आता भिमाले बंड करणार की भाजपा त्यांची नाराजी दूर करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा -