नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीवादावरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. "सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहे, ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. "'बटेंगे तो कटेंगे' या प्रचारावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. "निवडणूका येतात आणि जातात, पण धर्माधर्मात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणी करू नये. पण भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचं भान नाही. जातीयवादाकडे निवडणूक न्यावी, यासाठीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी आणलं," असंही पवार यावेळी म्हणाले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत अजिबात चिंतेचं कारण नाही : "नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचं कारणच नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची स्थिती चांगली आहे. इथले मतदार भाजपाच्या विचारसरनीला अजिबात पाठींबा देणार नाहीत," असं म्हणत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
अशोक चव्हाण संधीसाधू : "चव्हाण कुटुंबाला काँग्रेसनं मुख्यमंत्रिपद दिलं, देशाचं गृहमंत्रिपद, अर्थमंत्रिपद, संरक्षणमंत्रिपद दिलं, स्वतः अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद दिलं आणखी काय द्यायचं? लोक समजतात त्यांना काय शिकवायचं ते शिकवतील," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. "शंकरराव चव्हाण यांनी एकदा काँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढला होता. पण त्यांच्या नावात काँग्रेस हा शब्द होता, काँग्रेसची विचारधारा होती. पण अशोक चव्हाण एकदम विरोधातील विचारधारेसोबत गेले, हा संधीसाधूपणा आहे," असं म्हणत शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा
- "भाऊसाहेब कांबळेंनी विश्वासघात केला, त्यांनी बॅनरवर माझे फोटो...", विखे पाटलांचा हल्लाबोल
- राज ठाकरेंकडं फडणवीसांची स्क्रिप्ट; ईडीची टांगती तलवार असल्यानं त्यांना बोलावं लागते, संजय राऊतांचा हल्लाबोल
- पोर्श कार अपघात प्रकरणावरुन सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हिंमत असेल तर..."