मुंबई CM Candidate Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुती की महाविकास आघाडीचा विजयी ध्वज लागणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी निवडणूक पूर्वतयारीला लागली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळं महायुतीत देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवारांची दावेदारी नकळत समोर आली. त्यामुळं मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहे.
पहिलं बहुमत नंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा - अजित पवार : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं चांगलं प्रदर्शन केलं नसल्यामुळं विधानसभा निवडणुकीचा दबाव त्यांच्यावर असणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त जागा विधानसभेत निवडून आणण्याचा प्रयत्न अजित पवार यांचा असणार आहे. राष्ट्रीय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार, यावर आपलं सडेतोड मत मांडलं. सर्वात प्रथम महायुतीतील घटक पक्षांना बहुमताचा आकडा पार करायचा आहे. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच 60 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
तो निर्णय सर्वांना मान्य - देवेंद्र फडणवीस : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. "निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. सत्ताधारी पक्ष हा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जात असतो. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा भाजपा पार्लमेंटरी बोर्ड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असणार आहे," असं म्हणत फडणवीसांनी चेंडू हा भाजपाच्या वरिष्ठांच्या कोर्टात टाकलाय.
अजित पवारांचा दाखवण्याचा प्रयत्न - हेमंत देसाई : अजित पवारांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यावरती ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. "कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि आपण देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहोत हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. गेल्या अनेक वर्षापासूनची मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा आहे. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळं निवडणुकीनंतर आपले सर्वात जास्त आमदार महायुतीत आले तर ते निश्चितच मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात. त्या अनुषंगानेच त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं असावं," असं मत हेमंत देसाई यांनी मांडलं.
शिंदेंशिवाय पर्याय नाही - विजय वडेट्टीवार : मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडं चेहरा नाही. त्यामुळं भाजपाला शिंदे यांच्या शिवाय पर्याय नसल्याचं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर भाजपाला मते मागावी लागतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोदींच्या दयेवर जगावं लागेल, तसेच भाजपानं अजित पवारांना दुसऱ्यासोबत जायला लावलं तरी ते जातील," असा टोला वडेट्टीवार यांनी महायुतीला लगावला.
एकत्रित बसून निर्णय घेऊ - जयंत पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की "महाविकास आघाडीत सर्वकाही अलबेल आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आमचं नेतृत्व केलं होतं. शरद पवारांनी देखील मार्गदर्शन करत नेतृत्व केलं. आम्ही मुख्यमंत्री पदासाठी एकत्रित बसून निर्णय घेऊ."