मुंबई : भाजपानं विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यामध्ये सुरक्षित जागेंचा समावेश करण्यात आलाय. भाजपानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत देवेंद्र फडवणीस, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण व माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे अनेक विद्यमान आमदारांच्या मतदार संघाचा या यादीत समावेश नसल्यानं तेथील आमदारांचे पत्ते कापले जाण्याचे संकेत दिले गेले आहेत.
बावनकुळे यांना विधानसभेसाठी पुन्हा संधी : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. यामध्ये 13 जागा महिलांसाठी, 6 जागा एसटी व 4 जागा एससीसाठी देण्यात आल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम नागपूर मधून निवडणूक लढवणार असून मागच्या निवडणुकीत पत्ता कट करण्यात आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. यासोबतच रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांना भोकर मतदार संघातून तिकीट देण्यात आलं असून खासदार, अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय.
विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाब्यामधून तर नितेश राणे यांना कणकवलीमधून उमेदवारी देण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांचं सदस्यत्व रद्द न केल्याप्रकरणी नार्वेकर हे विरोधकांच्या निशाण्यावर होते. तर लव्ह जिहाद प्रकरणावरून सतत मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे हे सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मुंबईत भाजपासाठी सर्वात सेफ असणाऱ्या बोरिवली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची घोषणा पहिल्या यादीत झाली नाही. या जागेवर सध्या सुनील राणे हे विद्यमान आमदार असून माजी खासदार गोपाळ शेट्टी इथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर घाटकोपर पूर्व मतदारसंघाचीही घोषणा करण्यात आली नसून येथं विद्यमान आमदार पराग शहा असून या जागेवर माजी मंत्री, आमदार प्रकाश मेहता उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग करत आहेत. त्यामुळं आमदार सुनील राणे व आमदार पराग शहा यांची धाकधूक वाढलीय.
असं होतं 2019 चं संख्याबळ : 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल हा 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती होती. तेव्हा भाजपानं 164 जागा लढवत 105 जागांवर विजय संपादन केला. तर शिवसेनेनं 124 जागा लढवत 56 जागांवर विजय संपादित केला होता. आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागा जिंकता आल्या होत्या. भाजपा-शिवसेना या युतीनं निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जमा केलं होत. परंतु अंतर्गत वादामुळं त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही.
हेही वाचा