पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडका सुरु झालाय. निवडणुकीत सर्वांचं लक्ष बारामती मतदार संघाकडे असणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीत पवार विरूध्द पवार सामना पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रात आजपासून सभा सुरू झाल्या आहेत. बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा नको, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय? याबाबत चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे अजित पवार यांनी उत्तर दिलंय.
मोठे नेते जिल्ह्यात सभा घेतात : पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अजित पवार बोलत होते. "मोठे नेते जिल्ह्यात सभा घेतात, तालुक्याचा ठिकाणी ते सभा घेत नाही. पुण्यात देखील त्यांची सभा असून बारामती पुण्यातच येतं," असं अजित पवार म्हणाले.
त्यावेळी पराभूत करायचं होतं : 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा झाली होती. असं अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "त्यावेळेस गोष्ट वेगळी होती. त्यावेळी त्यांना मला पराभूत करायचं होतं, म्हणून त्यांनी बारामतीत सभा घेतली होती. आता त्यांना पराभूत करायचं नाही, तर निवडून आणायचं आहे. त्यामुळं ते सभा घेत नाहीत."
नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न : एका पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या संदर्भात खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मात्र भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "छगन भुजबळ यांनी याबाबत खुलासा केला. ते याबाबत कोर्टात देखील जाणार आहे. निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहे, तसतसं महत्त्वाचे प्रश्न बाजूला करून नवीन नरेटीव्ह सेट केलं जात आहे."
हेही वाचा