मुंबई Lok sabha Elections : लोकसभा निवडणूक जागा वाटपाचा तिढा अद्याप महायुतीत सुटलेला नाही. तसेच राज्यातील अनेक जागांवरून महायुतीत सस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघ जागेवरून नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी दावा केलाय. तर दुसरीकडं या जागेवर शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ यांनीही अमरावतीची जागा आमचीच आहे असं म्हटलंय. आज पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी अमरावतीची जागा ही शिवसेनेची असून, यावर आम्ही लढण्यास ठाम आहोत, असं म्हटलंय. आज त्यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
आम्ही युती धर्माला पटणारे वागतोय : महायुतीत जागा वाटपावरून सध्या चर्चा सुरू आहे. तसेच अमरावती या जागेवरून सुद्धा महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कारण अमरावतीची जागा मागील कित्येक वर्षापासून शिवसेना लढवत आहे आणि जिंकत आहे. मात्र या जागेवरुन आता जी सध्या महायुतीत बोलणी सुरू आहेत ती युतीधर्माला धरून नाही. युती धर्माला न पटणारी चर्चा सुरु आहे. आम्ही या जागेवर दावा केला आहे आणि ही जागा लढणार असून, येथे विजयी देखील होणार आहोत, असा विश्वास यावेळी आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलाय.
अमरावतीच्या जागेवर आम्ही ठाम : अमरावती जागेवरून रवी राणा आणि नवनीत राणा यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही जागा आपणास मिळावी, अशी मागणी केली आहे असा प्रश्न आनंदराव अडसूळ यांना विचारला असता. आम्ही युतीधर्म पाळत आहोत, आता वरिष्ठ पातळीवर या जागेवरुन बोलणी सुरु आहेत. मला माहित नाही निर्णय का होईल? पण या जागेवर आजही आम्ही ठाम आहेत. अमरावतीची खऱ्या अर्थाने जागा शिवसेनेची आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आम्हाला या जागेविषयी शब्द दिला आहे. त्यामुळं ही जागा आम्हालाच मिळेल, असंही आनंदराव अडसूळ म्हणाले.
मुख्यमंत्री निर्णय घेतील : जर महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना अमरावतीत घोषित केलं तर आपण प्रचाराला जाणार का? यावर आनंदराव म्हणाले की, जी गोष्ट मनाला पटत नाही ती करण्याचा मुळीच प्रश्न येत नाही. अमरावतीच्या जागेवरून खूप दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण तिढा सुटलेला नाही. अमरावतीत दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर या जागेवर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा असं आनंदराव अडसूळ म्हणाले. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. जोपर्यंत या जागेवर काही निर्णय होत नाही. तोपर्यंत मी अपक्ष लढणार का? किंवा लढणार नाही. हा निर्णय आत्ताच घेणं योग्य नाही. पण जेव्हा या जागेवरून निर्णय होईल, त्यानंतर माझा निर्णय मी घेईन असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंदराव आडसूळ यांनी सांगितलं.
हेही वाचा -