रत्नागिरी Vinayak Raut VS Narayan Rane : चिपळूणमध्ये आज (5 एप्रिल) इंडिया आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. तसंच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
काय म्हणाले विनायक राऊत : या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विनायक राऊत म्हणाले की, "आमच्यासमोर कोणीही येऊदेत, किमान अडीच लाखाच्या फरकानं त्याला आपटणार. तसंच महायुतीचा उमेदवार 12 तारखेपर्यंत ठरला तरी पुष्कळ आहे", असा टोला राऊत यांनी लगावला. किरण सामंत हे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरले असते, नारायण राणे हे माझ्यासाठी आव्हान नाही. राणे यांना तिसऱ्यांदा चितपट करण्याची संधी मला लाभणं हे माझं भाग्य आहे. नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावं लागेल", असं भाकीतही यावेळी राऊत यांनी वर्तवलं.
देवेंद्र फडणवीसांना विरोध : पुढं राऊत म्हणाले की, "कोकणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सिडको आणून जमीन लाटू पाहत आहेत. त्याला आमचा विरोध कायम राहणार आहे." तसंच हार्मोनियमचे महत्व निलेश राणे यांना कळणार नाही, राडेबाज विकृतीचं महत्व त्यांना चांगलं कळतं, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यावरही हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकीत कोकणात राऊत आणि राणे यांचा पारंपरिक विरोध आहे. विशेषतः राणेंनी शिवसेना सोडल्यापासून त्यांचा हा विरोध नेहमीच दिसून आला आहे. आता या निवडणुकीत काय होतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा :
- ठाकरे पिता-पुत्र जेलमध्ये जातील; नारायण राणेंची उद्धव ठाकरे यांच्यासह 'या' दोन नेत्यांवर टीका - Lok Sabha Election 2024
- किरण सामंतांची माघार ही नारायण राणे यांनी दम दिल्यामुळेच - आमदार वैभव नाईक यांची टीका - Lok Sabha Election 2024
- कोण आहेत किरण सामंत? रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाच लढविणार-नारायण राणे - Narayan Rane Press Conference