छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Shivsena Candidate Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानं आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेमधील रस्सीखेच संपलीय. तसंच पक्षांतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेल्या विविध नावाच्या अफवांना आता पूर्णविराम मिळालाय. शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवरून संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून संभाजीनगरात आता चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत होणार आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार : छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं इथे आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. हे दोन्हीही उमेदवार मूळ शिवसेनेचे असल्यानं या जागेवर कोण बाजी मारतं? याकडं राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय. दरम्यान, संभाजीनगरातील जागेसाठी भाजपानंही जोर लावल्याचं बघायला मिळालं होतं. त्यामुळं, ही जागा भाजपाला सुटणार की शिवसेनेला याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मंथन होत होतं. अखेर, ही जागा शिवसेनेला मिळाली असून संदीपान भुमरे खैरेंविरुद्ध निवडणूक लढणार आहे.
ठाणे, नाशिकचा उमेदवार कधी ठरणार? : दुसरीकडं महायुतीतून अद्यापही नाशिक, ठाणे आणि दक्षिण मुंबईतून उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळं या ठिकाणी महायुतीतील तिढा कधी सुटणार आणि कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. तर ठाणे, दक्षिण मुंबई आणि नाशिक या जागा शिवसेनेच्या वाट्याच्या असल्या तरीसुद्धा भाजपानं ठाणे आणि नाशिकवर दावा केलाय.
संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संदीपान भुमरे म्हणाले की, "मला या लोकसभा मतदारसंघासाठी कोणाचा विरोध नसणार आहे. कारण, उमेदवारी जरी उशिरा मिळाली असली तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी कामाला लागले होते. यामुळं माझे प्रतिस्पर्धी चंद्रकांत खैरे किंवा इम्तियाज जलील नाही, ही निवडणूक एकतर्फे होईल", असा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -