पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं सर्वच पक्ष कामाला लागलेत. मात्र, आता निवडणुकीत एका जातीच्या बळावर जिंकणं शक्य नाहीत, असं म्हणत मराठा आंदोलत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केलीय. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच बारामतीमधून आदेश गेला असावा म्हणून जरांगे पाटलांनी निवडणुकीतून पळ काढला असल्याचंही हाके म्हणाले.
नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके? : पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरुन हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "मी नेहमी सांगत आलोय की, मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार नाहीत किंवा निवडणुकीला सामोरं जाणार नाहीत. ते केवळ बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागतात. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका जातीची नाही तर सर्वसमावेशक भूमिका मांडावी लागते. जत्रा भरवणं सोपं असतं. पण लढणं अवघड असतं. मनोज जरांगेंनी ही माघार बारामतीकरांच्या आदेशावरुन घेतली असावी." पुढे हाके म्हणाले, " खरं म्हणायचं तर जरांगेंनी निवडणुकीतून पळ काढायला नको होता. रणांगणात आमने-सामने लढायला पाहिजे होतं. पण त्यांनी पळ काढला," असा टोलाही हाके यांनी लगावला.
आज यादी जाहीर करणार : पुढं ते म्हणाले की, "आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही आमची यादी जाहीर करणार आहोत. यात मराठवाड्यातील काही उमेदवार तसंच राज्यातील विविध मतदार संघातील काही उमेदवार असणार आहेत. जे कोणी उमेदवार हे ओबीसींच्या न्याय हक्काची भूमिका मांडणारे असतील, त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत. त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत." तसंच जे नेते जरांगे पाटील यांना भेटून आले आहेत. त्यांच्या विरोधातदेखील आम्ही प्रचार करणार असल्याचं यावेळी हाके यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज न आल्यानंतर म्हणाले 'एका जातीच्या नावावर निवडणूक लढता येत नाही'
- जरांगे पाटील 'येडा' माणूस; ओबीसी 'या' उमेदवारांना मतदान करणार नाही, लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
- मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट, लक्ष्मण हाके यांचा आरोप; म्हणाले "मद्यपान केल्याचा पुरावा दाखवा" - Laxman Hake Allegations