नागपूर Jayant Patil : " शरद पवारच ओरिजिनल पवार आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळतोय. त्या विजय होतील, अशी आम्हाला खात्री आहे," राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.
शरद पवारांनी ठरवलं असतं तर ते गेले असते : अजित पवार एनडीएमध्ये गेल्यानंतर शरदही जाण्यास तयार झाले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जातोय. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दुजोरा दिलाय. यासंदर्भात जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, "शरद पवार यांना एनडीएमध्ये आणण्याचे सगळ्यांचे प्रयत्न होते. शरद पवार जर तयार होते तर गेले असते, पण ते कधीही तयार नव्हते. त्यांची विचारसरणी स्वीकारायला शरद पवार यांनी स्पष्टपणे नकार दिला. काही झालं तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका शरद पवार यांनी घेतलेली आहे."
कोण असली कोण नकली : गुरुवारी नांदेडच्या सभेत अमित शाह यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी असं म्हटलं होतं. यालाही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, " त्यांनी एका पक्षाचे दोन तुकडे करायचे. एकाला नकली व दुसऱ्याला असली म्हणायचं. ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनी कोण असली आणि कोण नकली हे कसं सांगायचं? कोण असली आहे हे जनतेला ठरू द्या," असं शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यांनी म्हटलंय.
सुजय विखेंना ती पद्धत माहित नसेल : "बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी अमोल कोल्हे यांनी लोकसभेत चांगली कामगिरी केली. त्यांनी वचन दिलं की जेव्हा ही शर्यत सुरू होईल. त्यावेळी मी घोडीवरुन येईल ही पद्धत आहे. बैलगाडा शर्यत चालू करताना घोडीवरुन पुढं सुरुवात करुन दिली. हे सुजय विखेंना पद्धत माहीत नसेल," असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. "बैलगाडा शर्यतीमध्ये ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचा वेड ग्रामीण भागात आहे. हे त्यांना माहिती नसेल," असे ते म्हणाले आहेत. अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना आमच्या पक्षात आणून सुजय विखेंच्या विरोधात उभा करण्यास विशेष प्रयत्न केले. त्यांनी पुढाकार घेतला म्हणून कदाचित सुजय विखेंचा अमोल कोल्हेवर राग असेल."
महाविकास आघाडीला परवडणार नाही : सांगलीच्या जागेवरुन अजूनही ओढताण सुरू आहे. काँग्रेसचा एक गट नाराज झालाय. गेल्यावेळी अत्यंत कमी मतं पडली असताना ती जागा शिवसेनेला दिल्यानं महाविकास आघाडीचं नुकसान होईल अशी मविआमध्ये धुसपुस सुरू आहे. यावर जयंत पाटील म्हणाले की "जागा वाटपाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. त्यावर पडदा पडलेला आहे. त्यामुळं जागा वाटपाचा जुन्या गोष्टी उकरून काढणं हे महाविकास आघाडीला परवडणार नाही."
एकनाथ शिंदेना कशाचा धाक दाखवला : ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवणं भाजपाची संस्कृती आहे, असा गंभीर आरोप गजानन कीर्तिकर यांनी केलाय. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "गजानन कीर्तिकरांचे जे बोल आहे, ते फार महत्वाचे आहेत. एकनाथ शिंदे गटाला कशाचा धाक दाखवला होता, ते कीर्तीकरांनी सांगितलंय. महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे. महाराष्ट्रच्या जनतेनं गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यांनी घ्यावं."
हेही वाचा :