कोल्हापूर Jayant Patil On BJP : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. तसंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. तसंच त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाविषयीही भाष्य केलं.
काय म्हणाले जयंत पाटील : यावेळी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, कोल्हापूर आणि साताऱ्यात महाविकास आघाडी दोन्ही जागा जिंकणार आहे. त्यामुळं महायुतीच्या जागा कमी होतील मग कसला 45 प्लसच दावा?" असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी केला. तसंच यावेळी माढा लोकसभेबाबत भाष्य करत ते म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकरांना माढा लोकसभा देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिलं होतं. मात्र, ते महायुती सोबत गेले. त्यामुळं माढा लोकसभेसाठी आता नवीन उमेदवार शोधावा लागेल."
पुढं ते म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत उमेदवार जाहीर केला आहे. यातून काही तोडगा निघतो का याबाबत चर्चा सुरू आहे, तसंच वंचित बाबत दोन दिवसात निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं.
राजू शेट्टींबाबत जयंत पाटील काय म्हणाले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार असल्याचं स्पष्टीकरण यावेळी जयंत पाटील यांनी दिलं. ते म्हणाले की, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आमच्याबाजूनं लढावेत अशी आमची इच्छा होती. पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय. जर राजू शेट्टींनी महाविकास आघाडीचा पाठिंबा नाही घेतला, तर तिथे दुसरा उमेदवार द्यावाच लागेल, असं ते म्हणाले. त्यामुळं आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर), डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्यासह आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्यापैकी महाविकास आघाडीकडून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा -