सातारा : गेल्या दीड-दोन वर्षात 2 पक्ष फोडून सत्तेत गेलेली लोकं प्रचंड विकास केल्याच्या आविर्भावात आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघाची माहिती घेतल्यावर कळलं की, इथे बाकी काही नाही पण बिअरबार वाढले, अशा शब्दांत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर खोचक टीका केली. ते पाटणमध्ये शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.
टोलमाफीला विरोध नाही, पण... : जयंत पाटील म्हणाले की, "मुंबईत जाणाऱ्या 5 मार्गावरील टोल हटवले. माझा त्याला विरोध नाही, परंतु निवडणुकीच्या तोंडावर असे निर्णय घेतले जात आहेत. याचा अर्थ आपण परत निवडून येणार नाही, याची त्यांना खात्री असावी. निवडणुकीत जो पैशांचा पाऊस पडणार आहे, ते आपल्याच खिशातून मारलेले पैसे असणार आहेत."
जनता त्यांची मंत्रिपदाची झूल उतरवेल : "सत्तास्थानी असताना विक्रमसिंह पाटणकर यांचं आदर्श काम आपण पाहिलं आहे. दुसऱ्या बाजूला मंत्रीपदाची झूल आहे म्हणून हवे ते करणारा लोकप्रतिनिधी आहे. अशा लोकांची झूल उतरवल्याशिवाय जनता गप्प बसत नाही. पाटण विधानसभा मतदार संघातील जनतेने या निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे," असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
सत्तेसाठी तिजोरीची दिवाळी : "सत्तेसाठी सरकार राज्याच्या तिजोरीची दिवाळी करायला चालले असल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली. या सरकारला घरी पाठवल्याशिवाय थांबायचं नाही. लोकसभेत मतांची कडकी झाल्यामुळे आता बहीण लाडकी झाली आहे," असा टोलाही खासदार कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेत बोलताना लगावला.
हेही वाचा