कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सर्वांच लक्ष लागलेल्या राज्यातील विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार. निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीला टोला लगावला.
एकाच टप्प्यात कार्यक्रम करणार : "महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार. महायुतीचं सरकार घाबरलंय. महायुतीनं पाहिजे त्या घोषणा करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे राज्यातील जनतेला कळून चुकलेलं आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळं आम्ही महायुतीचा एकाच टप्प्यात कार्यक्रम करणार," असा इशाराच जयंत पाटील यांनी महायुतीला दिला. कोल्हापुरातील इचलकरंजीत ते पत्रकारांशी बोलत होते.
लाडकी बहीण योजनेला विरोध नाही : जयंत पाटील यांनी यावेळी लाडकी बहिण योजनेवरूनही सरकारच्या निशाणा साधला. "आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही. उलट आम्ही राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर बहिणींना महायुतीनं दिलेल्या लाभापेक्षा जास्त लाभ कसा देता येईल, यासाठी उपाययोजना करण्याचं काम करणार आहोत," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
जागा वाटपावरून वाद नाही : "दम देऊन पक्ष फोडण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलंय. त्यामुळं ते कधीचं मनानं एकत्र येऊ शकत नाही. तसंच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद नाही. जवळपास 218 जागा निश्चित झाल्या आहेत. 60 ते 70 जागांचे निर्णय झाल्यासारखे आहेत, त्यावर शिक्कामोर्तब करायचं," असं जयंत पाटील म्हणाले.
इचलकरंजीत मदन कारंडे यांचं शक्ती प्रदर्शन : महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मिळण्याची चिन्हे आहेत. यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे प्रांतीय सदस्य मदन कारंडे यांनी मोर्चेबांधणी केली. आज खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात इचलकरंजीत आलेल्या 'शिव स्वराज्य' यात्रेदरम्यान कारंडे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारीचा दावा केला.
हेही वाचा