छत्रपती संभाजीनगर Imtiyaz Jaleel : नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू असल्याचा हल्लाबोल एमआयएम प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय, राणे यांचा मुलगा एका समाजाबद्दल वादग्रस्त बोलत असताना सरकार काहीच करत नाही. त्यामुळं कायद्यात राहुन मुंबईला येऊन संविधानाची प्रत देणार आहोत. कोणत्या एका पक्षाचा नाही तर समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत जाब विचारणार आहोत. तर धारावीमध्ये घडलेला प्रकार म्हणजे आगामी निवडणुकीसाठी वातावरण तापवण्याचा प्रकार असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.
23 सप्टेंबरला मुंबईला जाणार : भाजपा नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी देखील समाजाबद्दल चुकीचं विधान केलं होतं. यांच्याविरोधात आम्ही 23 सप्टेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, आम्ही कुठल्या पक्षाकडून नाही तर मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूना जी लोक बोलली त्यांच्याविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी मुंबईला जाणार आहोत. संभाजीनगर पोलिसांनी आम्हाला नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही शहरात काहीच करणार नाही, आम्ही मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून संविधान भेट देणार आहोत. आम्ही मुंबईकडं मोठ्या संख्येने निघणार असून कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात नसेल असं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं.
धारावी प्रकरण म्हणजे, निवडणुकीत वातावरण निर्मिती : धारावी मशिदीबाबत काहीही चुकीचं नव्हतं. यांना राज्यात दंगली करायच्या आहेत. निवडणुकीत मतदान मिळवण्यासाठी दोन समाजात वाद घडवून आणत वातावरण तापवायचं आहे, त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्या आघाडीबाबत (संभाजी राजे आघाडी) ती लोक आम्हाला जातीवादी म्हणतात. पण मी दहा वर्ष संभाजीनगरचा लोकप्रतिनिधी होतो. मी किंवा असद ओवैसी यांनी काय जातीयवादीपणा केलाय का? कुठल्या धर्मबाबत बोललो आहे का? हे आम्हाला दाखवून द्यावं, पुरावा द्यावा. तुमच्या तोंडी सुद्धा आता सत्ताधाऱ्यांचीच भाषा असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी तिसऱ्या आघाडीवर केला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीला आम्ही प्रस्ताव पाठवला होता, हे सत्य आहे. मात्र, त्यांच्याकडं काहीही उत्तर आलेलं नाही ते आल्यास आम्ही नक्की सांगू असं त्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -
- पोलिसांना धमक्या देणाऱ्या आमदार नितेश राणेंवर कारवाई होणार का? 'आयजी' फुलारी म्हणाले, "जे घडलं त्याबद्दल माझ्याकडे..." - Kolhapur Zone IG Sunil Phulari
- "फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला...", संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane
- आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मदत नाही - Prakash Ambedkar