नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून विद्यमान विधान परिषदेचे सदस्य आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपाच्या माजी खासदार हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते हे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा आरोप हिना गावित यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळं मी शिवसेनेचा प्रचार करणार नाही, परंतु गद्दारी देखील करणार नाही, असं माजी खासदार हिना गावित म्हणाल्या आहेत.
हिना गावित यांची बंडखोरी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र स्पष्ट झालय. भाजपाच्या प्रवक्त्या माजी खासदार हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी करण्याबाबत ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळं महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात शिवसेनेचे कार्यकर्ते : "लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीच्या विरोधात काम करून गद्दारी केली. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून लढणार आणि शिवसेनेच्या उमेदवाराला हरवून महायुतीत सहभागी होणार. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते भाजपाचे उमेदवार विजयकुमार गावित यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते कमी पण शिवसेनेचे कार्यकर्ते जास्त सहभागी होत आहेत, असा आरोप हिना गावित यांनी केलाय.
सर्वाधिक विकासकामं अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात : "शिवसेनेचे धुळे आमि नंदुरबार संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे महायुतीच्या विरोधात काम करीत असल्याबाबत महायुतीतील नेत्यांकडे तक्रार केली होती. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागा ही भाजपालाच देण्यात यावी, याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे ठाण मांडून बसलो होतो. परंतु ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं येथे आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात सर्वाधिक कामं केली आहेत," असं हिना गावित म्हणाल्या.
चारही विधानसभा मतदारसंघात गावित परिवाराचे उमेदवार : नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात गावित परिवारातील उमेदवार उभे आहेत. अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. हिना गावित यांचे वडील विद्यमान आमदार तथा मंत्री विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून लढणार आहेत. तर त्यांचे काका काँग्रेसकडून शहादा विधानसभा मतदारसंघातून, लहान काका नवापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.
हेही वाचा