मथुरा (उत्तर प्रदेश) Hema Malini : चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी आज मथुरा येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपानं तिसऱ्यांदा 75 वर्षीय हेमा मालिनी यांना मैदानात उतरवलंय. भाजपाच्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
मागील वर्षी पंतप्रधानांना मंत्रमुग्ध करणारं केलं होतं नृत्य : हेमा मालिनी या 75 वर्षांच्या आहेत. अशा स्थितीत त्यांना यावेळी तिकीट मिळणार की नाही, अशी अटकळ बांधली जात होती. गेल्या वर्षी कृष्णभक्त मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मंत्रमुग्ध करणारं नृत्य सादर केलं होतं. पंतप्रधान मोदी हे सुमारे दीड तास मीराबाईंवर आधारित नृत्य पाहत राहिले. त्यानंतरच भाजपा हेमा मालिनी यांना मथुरेतून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अत्यंत स्वच्छ प्रतिमेमुळं त्यांची उमेदवारी भक्कम मानली गेली. अखेर भाजपानं त्यांना तिकीट जाहीर केलं.
- मी फक्त मथुरेमधूनच निवडणूक लढवणार : नुकतंच हेमा मालिनी यांनी स्वतः निवडणूक लढवणार असेल तर मथुरेतूनच निवडणूक लढवणार अन्यथा निवडणूक लढवणार नाही, असं जाहीर केलं होतं. त्यामुळं भाजपानं त्यांना तिसऱ्यांदा मथुरेमधून उमेदवारी दिलीय.
राजकीय कारकिर्द अशी आहे : हेमा मालिनी यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. 1999 मध्ये हेमा मालिनी यांनी अभिनेता विनोद खन्ना यांच्यासाठी प्रचार केला. ते पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. त्यानंतर हेमा मालिनी यांना 2003 ते 2009 या कालावधीत नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेत स्थान मिळाले. मार्च 2010 मध्ये त्यांची भाजपाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. 2011 मध्ये त्या राज्यसभेवर परतल्या. त्यानंतर 2014 मध्ये आरएलडीच्या जयंत चौधरी यांच्याविरोधात विजय मिळवून त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला.
योगी आदित्यनाथ घेणार सभा : उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज जाहीर सभा घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मथुरा मतदारसंघातील उमेदवार विद्यमान खासदार हेमा मालिनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही तिथं उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
काँग्रेसनं मुकेश धनगर यांना रिंगणात उतरवलं : दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रिया 28 मार्चपासून सुरू झाली होती. मात्र, काँग्रेसमध्ये उमेदवारांबाबत संभ्रम कायम होता. गेल्या अनेक दिवसांपासून मथुरा लोकसभा मतदारसंघातून ऑलिम्पिक विजेते बॉक्सर विजेंद्र सिंग यांना उभं करण्याची तयारी सुरू होती. पण ऐनवेळी विजेंद्र सिंग यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसनं बुधवारी सायंकाळी उशिरा पक्षाचे प्रदेश सचिव मुकेश धनगर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुकेश धनगर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहेत. बसपाचे उमेदवार सुरेश सिंह यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. राष्ट्रीय समता विकास पक्षाचे जगदीश व अपक्ष उमेदवार डॉ.रश्मी यादव, अपक्ष उमेदवार मोतीराम यांनी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा :