नवी दिल्ली/मुंबई Rajya Sabha Election 2024 : देशभरातील १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगानं सोमवारी (29 जानेवारी) अधिसूचना जारी केली आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचाही समावेश आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील सहा खासदारांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहऱ्यांना तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश : महाराष्ट्रातल्या राज्यसभा सदस्यांची मुदत 2 एप्रिलला संपणार आहे. देशभरातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण, उद्धव ठाकरे गटाचे सदस्य अनिल देसाई तसंच नारायण राणे यांचाही कार्यकाळ समाप्त होत आहे. दरम्यान, शिंदे गट आणि अजित पवार गटाला जास्त संख्याबळ असल्यामुळं पहिल्यांदाच राज्यसभेत सदस्यत्व मिळणार आहे. तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला संख्याबळाअभावी अडचणी येण्याची शक्यता आहे.
'या' राज्यात होणार निवडणुका : केंद्रीय निवडणूक आयोगानं 15 राज्यातील 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्यांचा कार्यकाळ हा 3 एप्रिल रोजी संपणार आहे.
महाराष्ट्रातील 'या' खासदारांचा कार्यकाळ संपणार : राज्यसभेचा कार्यकाळ संपणाऱया एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळं आता या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -