मुंबई Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडं देशासह राज्याचं लक्ष लागलंय. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. मात्र बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सोयल शेख यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह निवडणूक अयोगानं दिलंय. त्यामुळं अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. मात्र आक्षेप फेटाळत अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह कायम ठेवलंय. निवडणुकीपूर्वी आक्षेप नोंदवायला हवा होता, आता रद्द चिन्ह करणं अशक्य असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी म्हटलंय.
आता चिन्ह रद्द करणं अशक्य : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि अपक्ष उमेदवारला तुतारी चिन्ह मिळालय. त्यामुळं मतदारसंघात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. यासाठी निवडणूक आयोगाकडं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता. याविषयी बोलताना चोक्कलिंगम म्हणाले की, "शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं मुक्त चिन्ह वाटप करण्यापूर्वी बारामती आणि इतर मतदारसंघात अपक्षांना तुतारी वाटपावर आक्षेप घ्यायला हवा होता. बॅलेट पेपरवर कोणतं नाव नाही येत फक्त चिन्ह येतं." तसंच मुक्त चिन्ह यादीत 'तुतारी' हे चिन्ह आहे. त्यामुळं मुक्त चिन्हा मधील हे चिन्ह परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि यवतमाळ-वाशीम मधील लोकसभा आणि इतर मतदारसंघात देखील अपक्ष उमेदवारांच्या मागणीनुसार तुतारी चिन्ह त्यांना देण्यात आलय. त्यामुळं चिन्ह वाटप झाल्यानं आता रद्द करता येणार नसल्याचं चोक्कलिंगम यांनी म्हटलंय. ज्यावेळी मुक्त चिन्हांची यादी प्रसिद्ध झाली तेंव्हा आणि चिन्ह वाटप करण्यापूर्वी आक्षेप घेणं आवश्यक होतं असंही चोक्कलिंगम म्हणाले.
ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया : शिवसेनेनं (ठाकरे गट) जाहीर केलेल्या 'जय भवानी, जय शिवाजी' या प्रचार गीतावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय. सदरचे दोन शब्द काढून टाकण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं. याविषयी बोलताना चोक्कलिंगम म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेमध्ये, लिखित दस्तऐवजांत धार्मिक शब्द वापरण्यास परवानगी नाही. प्रचार रॅली आणि सभांमध्ये हे शब्द उच्चारले तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
हेही वाचा :