मुंबई Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक प्रचाराला आता वेग आलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काही दिवस बाकी असताना, आता प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी शिवसेना शिंदे गट यांच्याकडून आठ उमेदवारांची पहिली यादी (Shiv Sena Candidates List) जाहीर करण्यात आली.
शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर : शिवसेना पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलीय. शिवसेनेनं अधिकृत पत्र काढत आठ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. "हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे", असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय.
उमेदवारांची यादी : दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलडाणातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाहीय.
श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसेंचं नाव नाही : शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली. नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावं या यादीत नाहीत. या दोन जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीनं तर ठाण्याच्या जागेवर भाजपानं दावा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं या दोन जागांचा पेच निर्माण झालाय. त्यामुळं हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची नाव कधी जाहीर होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा -