ठाणे CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : अयोध्येत प्रभू श्री रामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह "जय श्रीराम" चा जयघोष करत महाआरती केली. स्वतः ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी लाखो रामभक्त मंदिर परिसरात उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंना टोला : ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू श्री रामाच्या कौपिनेश्वर मंदिरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाआरती केली. हा ऐतिहासिक सोहळा कोणी पाहात असेल किंवा नसेल माहिती नाही. पण हा सोहळा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोघे नक्की पाहात असतील, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार : महाराष्ट्र आणि अयोध्येचं एक आगळं वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. तसंच सर्वांचं स्वप्न साकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी शेकडो रामभक्तांसह खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त अभिजीत बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
उचलली चांदीची गदा आणि वाजवला ढोल : महाआरतीसाठी मुख्यमंत्री मंदिरात आल्यावर त्यांनी माईक हातात घेत, 'जय श्री राम'ची घोषणा दिली. त्यामुळं मंदिराच्या आवारात उपस्थित असलेल्या भक्तांनी 'जय श्री राम' नामाचा जयघोष केला. या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना चांदीची गदा भेट देण्यात आली, त्यांनी ती गदा उचलली. तसंच मुख्यमंत्र्यांनी १११ फूट लांब अगरबत्ती प्रज्वलित केली व यानंतर ढोल वाजून आनंदोत्सव साजरा केला.
मनसेनं केली पहिली मंदिरात महाआरती : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात उपस्थिती लावून महाआरती केली. या महाआरतीला मनसेचे नेते अभिजीत पानसरे आणि शहराध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा -