मुंबई- भाजपामध्ये विरोधी पक्षांचे अनेक मातब्बर नेते प्रवेश घेत असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतत आहेत. पुढील आठवड्यात भाजपामध्ये दिल्लीत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. त्यांच्या भाजपामधील पक्षप्रवेशामुळे जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपाला फायदा मिळू शकते.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. खडसे यांनी भाजपामध्ये 40 वर्षे विविध पदावर जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन त्यांना तीन वर्षांहून अधिक काळ उलटला.
एकनाथ खडसे म्हणाले, "भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधला. त्यांना पक्षात परतण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मी पुढील आठवड्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. भाजपामध्ये पुन्हा प्रवेश का करत आहेत, असे विचारले असता खडसे म्हणाले, " मी गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ भाजपात काम केलं आहे. पक्षाचा विस्तार करण्याकरिता तळागाळापासून खूप मेहनत घेतली आहे. काही राजकीय घडामोडींमुळे नाराज झालो होते. त्यानंतर पक्ष सोडून गेलो हतो.
शरद पवारांशी चर्चा नाही- भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केली का, असे विचारले असता खडसे यांनी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. आमदारकीचा राजीनामा देणार का, असे विचारले असता खडसे म्हणाले, "त्याबाबत विचार केलेला नाही. शरद पवार गटाचे तीनच आमदार असल्याने काही फरक पडत नाही," असेही त्यांनी सांगितले. दरम्यान जळगावचे असलेले शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका सभेत बोलताना एकनाथ खडसे 8 किंवा 9 एप्रिलला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं.
पाच वर्षे राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून राहिले दूर- 2016 मध्ये भोसरी भूखंड खरेदीचा कथित गैरव्यवहार घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे विश्वासू असलेले गिरीश महाजन यांनी आपली राजकीय कारकीर्द उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खडसे यांनी यापूर्वी केला होता. भाजपामध्ये सर्वाधिक वजनदार नेते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून एकनाथ खडसे यांनी राजकारणात छाप पाडली होती. मात्र भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते पाच वर्षे राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. 2020 मध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यानंतर ते विधानपरिषदेचे आमदार झाले. एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री पदाचा गैरवापर करून पत्नीसह जावयाला जमीन देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कार्यकर्ते हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून पुणे शहरातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली.
एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानं भाजपाला काय होणार फायदा?
- एकनाथ खडसे यांनी जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढविली होती. भाजपाला उत्तर महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी खडसेंच्या जनसंपर्काचा भाजपाला फायदा होऊ शकतो.
- माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर खडसे यांची वजनदार ओबीसी नेता अशी राज्यात ओळख निर्माण झाली. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे मतांचे विभाजन अनेकदा दिसून येते. खडसे यांच्या भाजपामधील प्रवेशामुळे ओबीसी व्होट बँक पुन्हा पक्षाकडे पुन्हा वळू शकते.
- खडसे हे लेवा पाटील समाजाचे आहेत. उत्तर महाराष्ट्रात लेवा पाटील समाजाची प्रभावी व्होट बँक आहे.
- भाजपाचं स्थानिक स्वराज्य संस्थांत फारसे अस्तित्व नसताना खडसे यांनी भाजपाला जळगाव जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक आणि जळगाव महापालिकेत सत्ता मिळवून दिली होती. जळगावात पुन्हा भाजपाची सत्ता वाढविण्यासाठी एकनाथ खडसे हे भाजपासाठी मदत करू शकणार आहेत.
- जळगावमधून भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्यांनी नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे जळगावमध्ये भाजपाच्या लोकसभेच्या उमेदावर स्मिता वाघ यांना निवडणूक लढविताना ठाकरे गटाचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत माजी मंत्री खडसे यांच्यामुळे जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचे पारडं जड होऊ शकते.
- खडसेंची सून रक्षा खडसे या रावेरमधून भाजपच्या खासदार आहेत. आगामी निवडणुकीत लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. भाजपातील पक्षप्रवेशामुळे ते आता महाविकास आघाडीच्या उमेदवारा मदत न करता सुनेसाठी प्रचार करू शकणार आहेत.
- एकनाथ खडसे हे जरी भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच असणार आहेत. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा-