पुणे Pune Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपानं माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि वंचितनं वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तसंच तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर आज (6 एप्रिल) पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना गांधी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी (Dr Kumar Saptarshi) यांनी लोकसभा निवडणुकीविषयी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले डॉ. कुमार सप्तर्षी : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं 'अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना गांधी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, "जर पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले, तर केंद्रात नक्कीच सत्ता बदल होईल". तसंच यावेळी सप्तर्षी यांनी भाजपावरही जोरदार टीका केली.
युवकांनी साधला शरद पवार यांच्याशी संवाद : पुण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी तरुणांशी संवाद साधत तरुणांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका विद्यार्थीनीनं महिला सक्षमीकरणासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला. देशाच्या किंवा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अतिशय कमी आहे, याची कारणं कोणती असू शकतात?, असं विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात महिलांना कमी लेखण्याची गरज नाही. कर्तृत्व तुम्ही महिला आहे की पुरुष यावर ठरत नाही. ज्या महिलांमध्ये कर्तृत्व आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. संरक्षण दलात महिलांच्या समावेशाचा निर्णय मी घेतला. आज दिल्लीत होणाऱ्या परेडचे नेतृत्व महिला करते, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -