मुंबई Arvind Kejriwal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा अपमान केलाय. उद्धव ठाकरे यांचाही नकली संतान म्हणून अपमान केलाय. हा अपमान केवळ या दोन व्यक्तींचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर इंडिया आघाडीला मतदान करा असं जाहीर आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मुंबईत महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेत केलं. या सभेला अनेक नेत्यांसह हजारो लोक उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित : महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत प्रचाराची सांगता सभा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं आयोजित करण्यात आली होती. या सभेला मुंबई आणि परिसरातून हजारो लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्रातून आणि देशातून भाजपाचं सरकार तडीपार करण्यासाठी मोठ्या संख्येनं जनतेनं मतदान करावं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला जतन करावं, असं आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केलं. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते आणि मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
मोदींना आता अमित शहांना पंतप्रधान करायचं आहे : या सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीमध्ये आम्ही भाजपाला सातत्यानं पराभूत करत आहोत. त्यामुळं त्यांनी चिडून जाऊन आम्हाला जेलमध्ये टाकलंय. आम्ही केलेला दिल्लीचा विकास यांना खपत नाही आणि त्यांना स्वतःलाही विकास करता येत नाही. त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं डाव आखलाय. जर तुम्हाला मला जेल बाहेर पाहायचं असेल तर महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला मतदान करा." तसंच मोदी यांनी स्वतःच भाजपामध्ये 75 वर्षे वयाची अट ठेवलीय. त्यामुळं मोदी आता 74 वर्षाचे आहेत. ते एक वर्ष पंतप्रधान राहून पुढील वर्षी अमित शाह यांना पंतप्रधान करणार आहेत. त्यामुळं ते स्वतःसाठी मत मागत असले तरी प्रत्यक्षात त्यांना अमित शाह यांनाच पंतप्रधान करायचं आहे आणि बाकी देशातील सर्व विरोधक आणि स्वतःच्या पक्षातील नेतेही संपवायचे आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. मोदी हे पंतप्रधानाला शोभेशी भाषा बोलत नाही तर सडकछाप नेतृत्व आहे, अशी टीका करत त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटलं तर उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटलं अशी भाषा कोणता पंतप्रधान वापरतो? हा केवळ पवार आणि ठाकरे यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे आणि महाराष्ट्राच्या अपमानाचा बदला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी घेतला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
आता संविधानाला वाचवायचं आहे : या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. शरद पवार म्हणाले की, "आपण आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या. मात्र, ही निवडणूक सर्वात वेगळी आहे. ही निवडणूक देशातील जनता विरुद्ध संविधानाचे मारक अशी आहे. आपल्याला देश वाचवायचा असेल, तुमचा मूलभूत अधिकार वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन एकत्रितपणे मोदी आणि भाजपा सरकारचा विरोध केला पाहिजे. तरच आपला देश वाचणार आहे. त्यामुळं सर्वांनी महाविकास आघाडीला मतदान करुन देश वाचवा."
हेही वाचा :