पुणे Deepak Kesarkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा अपक्ष लढण्याची तयारी केलीय. त्यामुळं शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात एका खासगी रुग्णालयात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी विजय शिवतारे यांची भेट घेतलीय.
कोणत्याही दुखण्याला औषध असतं : बारामती लोकसभा अपक्ष लढण्याच्या त्यांच्या ठाम भूमिकेमुळं महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. बऱ्याच दिवसांचे हे राजकीय मतभेद आहेत. पण काही दुखणं असेल तर त्याला औषधी असतं, औषध घेतल्यानंतर दुखणं बरं व्हायला वेळ लागते. तसंच आज कुठलीही राजकीय चर्चा आम्ही केली नाही. प्रथम त्यांची तब्येत व्यवस्थित व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला आणि राहुल शेवाळे यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. शनिवारी शंभूराजे येणार आहेत. आम्ही एक परिवार आहोत, त्यामुळं आजही भेट घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.
भेटीत काही राजकीय चर्चा नाही : राज्यात जरी महायुती असली तरी बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. "विजय शिवतारे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा महायुतीचं कर्तव्य बजावा असं त्यांना सांगावं लागलं. परंतु यावर काही निर्णय न झाल्यानं ही भेट झाल्याची माहिती आहे. आम्ही एक परिवार आहोत, मी राज्याचा राज्यमंत्री असताना तेही मंत्री होते. त्यामुळं आमचा एक परिवार आहे आणि परिवारातील व्यक्तीनं आपल्या माणसाची काळजी घ्यावी, यासाठी आम्ही भेट घेतलीय. आज काही राजकीय चर्चा झाली नाही," असं दीपक केसरकर म्हणाले. "जेव्हा किंवा राजकीय चर्चा होईल तेव्हा, आम्ही बसू एकत्र चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी बोलून जरी तोडगा निघाला नसला, तरी दुखण्याला औषध असतं आणि शेवटी ते आमचे नेते आहेत. पक्ष म्हणून ते पक्षाचाही विचार करतील. आम्ही एकत्र आलो एवढं मोठं बंड केलं ते बाळासाहेबांचे विचार मानून केलेलं आहे. नाहीतर सर्वत्र काँग्रेसची सत्ता आली असती, त्यामुळं त्यावर चर्चा होईल," असं त्यांनी म्हटलंय.
जागावाटप लवकरच होईल : मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली, यावर बोलताना ते म्हणाले, "आम्ही म्हणतो संयम बाळगा श्रीकांत शिंदे यांनी कुठला अधिकार वापरला नाही किंवा कोणी त्यांना दिला नाही. पण ते आमचे दोन वेळेचे खासदार आहेत. चांगलं काम करतात, त्यांना फक्त त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात काही गैरसमज नाही. जागावाटप आमचे प्रवक्ते लवकरच करतील."
महायुतीतला तणाव कमी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न : विजय शिवतारे सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण मध्यरात्री ही भेट झाल्यानं चर्चा होत आहे. रात्री साडेबाराच्या दरम्यान राहुल शेवाळे आणि मंत्री दीपक केसरकर यांनी ही भेट घेतलीय. त्यामुळं महायुतीतला तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. तर एकीकडे अजित पवारांच्या अडचणी वाढत असताना विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळं मार्ग काढण्यासाठी आता सगळ्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय.
हेही वाचा :