मुंबई Nana Patole : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालंय. कार्यकर्त्यांनी एकजूटीनं काम केल्यानं 14 जागांवर दणदणीत विजय मिळवता आला. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं आहे, एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणं गरजेचं आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकलीय, आता विधानसभा हे आपलं लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास राज्याचे कॉंग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय.
जनता मोदींच्या अपप्रचाराला बळी पडली नाही : मुंबईतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली. यावेळी सर्व नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, "आघाडीचं राजकारण सोपं नसतं पण सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन महाविकास आघाडी मजबूत केली व निवडणुकीला सामोरं गेलो. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी ऐक्य केलं आणि जनतेनंही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत कौल दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या. मंगळसुत्र, हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे पुढे करत विभाजनकारी राजकारण केलं. पण जनता यावेळी मोदींच्या अपप्रचाराला बळी पडली नाही."
पक्षाला मोठा विजय : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलून जनतेत आत्मविश्वास निर्माण केला. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तानाशाही सरकार विरोधात ते उभे राहिले आणि त्यांच्या पाठीमागे जनता उभी राहिली. राहुल गांधी यांनी दिलेली गॅरंटीवर जनतेनं विश्वास ठेवला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि कार्यकर्त्यांचा मेहनतीमुळे काँग्रेस पक्षाला हा मोठा विजय प्राप्त करता आला. या विजयात सर्व जाती-धर्माच्या लोकांच समर्थ नसून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."
मोदी सरकारला अजून अडचणीत आणता आलं असतं : वर्षा गायकवाड यांचा मतदारसंघ काँग्रेसनं मागितला होता. त्यासोबत अमोल कीर्तीकर ज्या लोकसभा मतदारसंघातून उभे होते, तो मतदारसंघह आपण मागितला होता. त्या जागा मिळाल्या असत्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असता आणि मोदी सरकारला अजून अडचणीत आणता आलं असतं. लढाई संपलेली नाही लढाई अजून तीव्र करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. येत्या काळात विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सगळीकडे काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकला पाहिजे असं आवाहन नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं. विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
हेही वाचा :