मुंबई Muslim Representation : केवळ मुस्लिम समाजाची मतं घेऊ नका तर मुस्लिम समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व देखील द्या, असा सूर कॉंग्रेसच्या मुस्लिम नेत्यांमधून उमटू लागला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मुस्लिम उमेदवाराला संधी मिळण्याची चर्चा असताना पुन्हा एकदा मुस्लिम उमेदवारांना डावलण्यात आल्यानं हा सूर आता तीव्र झाला आहे.
एकाही मुस्लिम उमेदवाराला संधी नाही : विधानपरिषदेतून निवृत्त झालेल्या सभासदांमध्ये कॉंग्रेसच्या डॉ. वजाहत मिर्झा यांचा समावेश होता. त्यामुळं त्या जागेवर मिर्झा किंवा मुस्लिम समाजातील उमेदवाराला संधी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं कॉंग्रेसला भरभरुन मतदान केल्यानं या चर्चेला वेग आला होता. मात्र कॉंग्रेसनं सगळ्या शक्यता धुडकावून लावत मुस्लिम उमेदवाराचा विचार या निवडणुकीत केला नाही. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्याचं समोर आलं. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) या तीन पक्षांपैकी एकाही पक्षाने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही मुस्लिमाला उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळं नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी या नाराजीला जाहीरपणे तोंड फोडलं होतं.
आगामी विधानसभेत मुस्लिम समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं : आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी राज्याचे माजी मंत्री, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. दलवाई यांनी ही मागणी करण्यासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नवी दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रातील मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्वापासून डावलण्यात येत असल्याची तक्रार दलवाई यांनी केली. विधानपरिषदेची जागा महाराष्ट्रातील काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याला मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, ऐन वेळेला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली. त्याबद्दल आमची तक्रार नाही कारण त्यांना विधान परिषदेचा संपूर्ण कालावधी मिळाला नव्हता हे खरं आहे. त्याचबरोबर त्या काँग्रेस पक्षाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. त्यामुळं आपली याबद्दल तक्रार करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं याची मागणी त्यांनी आग्रहपूर्वक मांडली.
राज्यात किमान 20 ते 25 जागा मुस्लिम उमेदवारांना मिळाव्या : महाराष्ट्रात मुस्लिम समाज 11.5 टक्के आहे. महाराष्ट्रात विधानसभेचे 40 मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत. तिथून मुस्लिम उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मुस्लिमांची संख्या लक्षात घेऊन 29 ते 30 जागा मुस्लिम समाजाला मिळाल्या पाहिजेत. मात्र कॉंग्रेसनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किमान 20 ते 25 जागा मुस्लिम समाजाला द्याव्यात अशी मागणी दलवाई यांनी पक्षाध्यक्षांकडे केली आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी तसा विचार करावा यासाठी काँग्रेस पक्षानं आग्रही भूमिका घेणं आवश्यक आहे, असं दलवाई यांनी खरगेंना सांगितलं. दरम्यान खरगे यांनी ही गोष्ट योग्य असून याचा विचार नक्की करु असं आश्वासन दिल्याची माहिती दलवाई यांनी दिली आहे.
हेही वाचा :