अमरावती- अमरावती लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनं लागावा, यासाठी तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी ताकद लावली होती. त्यावेळी तिवसा विधानसभा मतदारसंघात आपण किती मजबूत आहोत हे एका अर्थानं यशोमती ठाकूर यांनी सिद्ध केलं.
यशोमती ठाकूर या केवळ आमदार किंवा माजी पालकमंत्री इतक्यापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. गेल्या 15 वर्षात त्यांनी राजकारणात घेतलेल्या भरारीमुळे त्यांची प्रदेश पातळीवर काँग्रेसच्या नेत्या म्हणून गणना झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर काँग्रेसच्या केंद्रीय वर्तुळातदेखील यशोमती ठाकूर यांनी आपला ठसा उमटवला. यशोमती ठाकूर यांची तिवसा मतदार संघातील उमेदवारी म्हणजे विरोधकांसमोर एक बलाढ्य आव्हानच ठरणार आहे.
भाजपाला उमेदवार देणं आव्हानात्मक- विरोधात मैदानात उतरणारा उमेदवार हा अगदीच कमकुवत आहे, असे मुरब्बी राजकारणी कधीच मानत नाहीत. यशोमती ठाकूर यांचा स्वभावदेखील मुरब्बी आहे. 2019 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर या 10 हजारांहून अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. यावेळी महायुतीत भाजपासाठी सुटणाऱ्या तिवसा मतदार संघात अद्याप महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. भाजपामधील प्रामाणिक आणि जमिनीवर राहून सामाजिक भावना जपणारा व्यक्ती यशोमती ठाकूर यांना नक्कीच टक्कर देऊ शकतो, असं तिवसा मतदार संघातील स्थानिक भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटतं. मात्र, संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एक धामणगाव रेल्वे मतदार संघ वगळता भाजपाचं फारसे अस्तित्व दिसत नाही.
तिवसा मतदार संघाचा परिचय-
- अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई आणि धामणगाव ही महसूल मंडळं, अमरावती तालुक्यातील शिराळा माहुरी जहागीर नांदगाव पेठ वलगाव महसूल मंडळ आणि भातकुली तालुक्यातील आष्टी, खोलापूरया महसूल मंडळांचा समावेश तिवसा विधानसभा मतदारसंघात होतो.
- 1978 साली तिवसा विधानसभा मतदार संघाची स्थापना झाली. 1978 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचे वडील चंद्रकांत उर्फ भैय्यासाहेब ठाकूर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेत. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रकांत ठाकूर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झालेत.
- 1990 च्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भाई मंगळे हे तिवसामधून निवडून आलेत.
- 1995 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे शरद तसरे यांना आपल्या मतदार संघाचे नेतृत्व जनतेने दिलं.
- 1999 आणि 2004 मध्ये मात्र तिवसा मतदारसंघात भाजपाचा झेंडा फडकला. या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे साहेबराव तट्टे हे विजयी झालेत. याच काळात तिवसा मतदार संघात भाजपा बळकट झाली.
- 2009 मध्ये मात्र काँग्रेसच्या उमेदवार म्हणून यशोमती ठाकूर यांनी दहा वर्षानंतर पुन्हा एकदा तिवसा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवला.
- 2014 आणि 2019 पासून यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातच काँग्रेसकडं तिवसा हा मतदारसंघ आहे.
- तिवसा मतदारसंघात देशमुख ,पाटील या मराठा मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
- मतदारसंघात मागासवर्गीय मतदारदेखील मोठ्या संख्येत आहेत. याशिवाय माळी आणि तेली या जाती या जातीही निर्णायक आहेत. मुस्लिम मतदारा मोठ्या संख्येत आहे.
मतदार संघावर यशोमती ठाकूर यांची पकड- तिवसा मतदार संघात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ एमआयडीसी हे सर्वात महत्त्वाचं ठिकाण राहिलं आहे. या एमआयडीसीतील उद्योगांकरिता स्थानिक अनेकांच्या शेतजमिनी गेल्यात. यामुळे येथील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, ही यशोमती ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका सातत्याने राहिली. मतदार संघातील प्रत्येक गावांचा दौरा यशोमती ठाकूर यांनी कायम सुरू ठेवला. अडीच वर्षे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासह आपला मतदार संघ विकासात्मक दृष्ट्या कुठेही मागे राहणार नाही, याची काळजी घेतली. अगदी छोट्या गावांमध्ये यशोमती ठाकूर यांनी उद्यान निर्मिती केली. कुऱ्हा येथील स्मशानभूमीचा कायापालट हे तर तिवसा विधानसभा मतदारसंघातील एक आदर्श विकासकाम मानले जाते. यशोमती ठाकूर यांच्या बाजूनं मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. असे असले तरी भाजपाकडून रणनीती आखली तर ठाकूर यांना विजयी होण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
यशोमती ठाकूर यांच्या विरोधात नेमकं कोण- 2019 च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या राजेश वानखडे यांना तिवसा मतदारसंघात उमेदवारी मिळाली होती. राजेश वानखडे हे तसे मतदारसंघाबाहेरचे होते. पाच वर्षांपूर्वी तिवसा मतदारसंघात शिवसेना जितकी बलाढ्य होती तशी अवस्था आज शिवसेनेची नाही. राजेंद्र वानखडे हेदेखील शिवसेना सोडून भाजपामध्ये गेले आहेत. 2019 च्या निवडणुकीतदेखील रविराज देशमुख उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र भाजपा, शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेला गेल्यांनं रविराज देशमुख हे पक्षासोबत प्रामाणिक राहिलेत. सलग पाच वर्षे मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविलेत. यशोमती ठाकूर यांच्यापुढे निवडणुकीत आव्हान उभं करायचं असेल तर भाजपाकडं रविराज देशमुख हे पर्याय असणार आहेत. तिवसा मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत निश्चितपणे पाहायला मिळेल.
2019 तिवसा विधानसभा निकाल
- यशोमती ठाकूर -काँग्रेस -76,218
- राजेश वानखडे -शिवसेना 65,857
- अशी आहे मतदार संख्या
- पुरुष : 1 लाख 49,426
- महिला : 1 लाख 42,378
- इतर : 02
- एकूण : 2 लाख 91,806
हेही वाचा-