मुंबई Prithviraj Chavan On Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोकराव चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर 'मला काँग्रेस पक्षानं खूप दिलंय. मी पक्षासाठी खूप कामं केली आहेत. पुढील दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करणार' असं अशोकराव चव्हाणांनी म्हटलंय. या सर्व प्रकरणावर आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. तसंच आम्ही पक्षासोबत ठामपणे उभा आहोत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
मतदार आमच्या सोबतच : यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाला का सोडून गेले, आणि त्यांच्यावर कोणता दबाव होता हे तेच सांगू शकतील. परंतू ते सोडून गेल्यामुळं आम्हा सहकाऱ्यांना धक्का बसलाय. आम्हाला त्याची खंत आहे. असं कधी घडेल असं वाटलं नव्हतं. मात्र, जरी अशोकराव चव्हाण गेले तरी, मतदार आमच्या सोबतच आहेत." तसंच उद्या काँग्रेस आमदार मुंबईत दाखल होतील, यानंतर बैठकीचं नियोजन केलं जाईल. पुढील एक दोन दिवसात विधिमंडळ सदस्यांची बैठक घेण्यात येईल. मात्र, अशोक चव्हाणांसोबत दुसरे कुठलेही आमदार जाणार नाहीत. फक्त ह्या भाजपाकडून वावड्या उठवल्या जात आहेत, असंही ते म्हणाले.
...म्हणून ते इतरांचे पक्ष फोडताय : पुढं ते म्हणाले की, "अशोकराव चव्हाण नाराज होते हे त्यांनाच तुम्ही विचारा. कोण कशासाठी पक्ष सोडतंय हे सर्वांना माहीत आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. पण भाजपाला आज महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक घ्यायची नाही. त्यांना त्यांचा पराभव दिसत असल्यानं ते इतरांचे पक्ष फोडत आहेत. अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन ताकद वाढवत आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही."
भाजपाचं लोटस ऑपेरशन? : "अशोकराव चव्हाण यांनी पक्षातून जाताना आपली भूमिका स्पष्ट केली नाही. काँग्रेस पक्षाच्या जागा वाटपामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. पण ते का गेले हे माहित नाही? यामध्ये भाजपाचे हे लोटस ऑपेरशन होते का? याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या भाजपाकडून फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे", असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपावर केला. तसंच येणाऱ्या निवडणुकींमध्ये कोणाला तिकिट द्यायचं हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ठरवतील, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही ठामपणे उभा : तसंच "भाजपाकडून असं होईल याचा सूतोवाच होता. त्यांनी जो निर्णय घेतलाय याबद्दल खंत व्यक्त करतो. त्यांच्यावर कसला दबाव होता, हे ते एक-दोन दिवसांत सांगतील. पण आम्ही शेवटपर्यंत काँग्रेससोबत असणार, आम्ही खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्यासोबत आहोत. तसंच येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष अधिक मजबुतीनं राजकीय आव्हानांना सामोरे जाईल आणि मोदी सरकारचा सामना करेल", असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा -