मुंबई Mamata Banerjee Meets Uddhav Thackeray : देशात सध्या 'इंडिया' आघाडी मजबूत असून आपण 'इंडिया' आघाडीचा भाग आहोत, असं स्पष्ट करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमुल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी ममता यांनी त्यांची भेट घेतली.
मोदींच्या काळातच खऱ्या अर्थानं आणीबाणी : ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या असून त्या अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित आहेत. मात्र, तत्पूर्वी त्यांनी शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारनं अनेक खासदारांना निलंबित करुन लोकशाहीची हत्या केली. संविधानाची हत्या केली हा अत्यंत वाईट दिवस होता," असं यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. मोदी यांच्या काळातच खऱ्या अर्थानं आणीबाणी लागू होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
"खेला तो शुरु हो चुका है" : क्या अब खेला होगा? असे विचारले असता ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "खेला तो अब शुरू हो चुका है. लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. आपण इंडिया आघाडीचा भाग असून इंडिया आघाडी ही अधिक मजबूत झाली आहे. मात्र,पश्चिम बंगालमध्ये आपण डाव्या पक्षांच्या विरोधात लढून निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत डाव्या पक्षांचाही समावेश आहे. असे असले तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र येणे कठीण आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा प्रचार करणार : सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेलं सरकार हे अनैतिक सरकार आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. तसंच आगामी निवडणुकांमध्ये आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचं यावेळी ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेत आहात. पण काँग्रेसच्या नेत्यांची भेट का घेत नाहीत? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, "मी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना फारशी ओळखत नाही. पूर्वी मुरली देवरा हे संसदेत होते तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख होती. मात्र, सध्या काँग्रेसच्या नेत्यांना मी ओळखत नसल्यानं भेट घेत नाही." यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "ही कौटुंबिक भेट असल्यामुळं राजकारणाविषयी आपण आता अधिक बोलू नये. त्याबद्दल आपण वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची एकत्र भूमिका नक्की मांडू."
हेही वाचा :