मुंबई CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. "खोटं बोल पण रेटून बोल ही उद्धव ठाकरे यांची संस्कृती आहे. खोटं बोलण्यालाही एक सीमा असते. मात्र, त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते खोटं बोलले," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 मध्ये आपली फसवणूक केली. फडणवीस यांनी स्वतः दिल्लीत जायची तयारी दर्शवून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो त्यांनी पाळला नाही." ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलंय.
खोटं बोल पण रेटून बोल, ही ठाकरेंची संस्कृती : यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "ठाकरे यांनी खूप मुलाखती दिलेल्या आहेत, बंद दरवाजा आड काय झालं, काय नाही याबाबतही त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. वास्तविक खोटं बोलण्यालाही एक सीमा असते. मात्र, उद्धव ठाकरेंनी खोटं बोलण्याचा सपाटा सुरू ठेवलाय. 'खोटं बोला पण रेटून बोला' ही त्यांची संस्कृतीच झालीय. वास्तविक त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होता आलं नसतं हे स्पष्ट आहे. म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की, आमची चर्चा झाली होती. वास्तविक अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुठलीही अशा पद्धतीची चर्चा झाली नव्हती. अमित शाह यांनी याबाबत स्पष्टपणे नकार दिलेला आहे. परंतु, उद्धव ठाकरे हे सातत्यानं खोटं बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही."
अजित पवारांना शपथविधीसाठी कोणी पाठवलं? : "अजित पवार यांनासुद्धा शपथ घेण्यासाठी कोणी पाठवलं होतं? हे आता उघड झालंय. त्यामुळं अजित पवार आता आमच्यासोबत आहेत. या राज्यामध्ये जे काही सर्वांगीण विकास आम्ही करतोय, या सर्व घटकांना घेऊन पुढं जातोय, केंद्राची मदत आम्हाला मिळतीय, मोदी यांनी देखील दहा वर्षांमध्ये जो काही देशाचा विकास केलेला आहे, तोही लोकांच्या समोर आहे. गेल्या 50- 60 वर्षात काँग्रेसनं काहीही केलं नाही आणि पुढच्या 100 वर्षात देखील करू शकणार नाहीत, तेवढा विकास मोदी यांनी दहा वर्षात केलाय," असं मुख्यमंत्री म्हणाले.
निवडणुकीमध्ये मिळेल कामाची पावती : "राज्यानं देखील केलेली विकासकामं, घेतलेला निर्णय, लोकांसाठी सुरू केलेल्या योजना, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांसाठी आज म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जातोय. 'शासन आपल्या दारी' सारखा लोकाभिमुख कार्यक्रम आम्ही केलाय. हे जनतेमध्ये जाऊन काम केलं, घरी बसून नाही. आम्ही फेसबुक लाईव्ह करत नाही," असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. "आम्ही डायरेक्ट लोकांसमोर बांधावर, शेतावर जातो आणि लोकांच्या अडचणी समजून घेतो. जनतेचं ऐकणार आणि ऐकून निर्णय घेणारं आमंचं सरकार आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये लोक केलेल्या कामाची पोचपावती देतील. घरी बसणाऱ्यांना नाही तर रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांना मतदान करतील," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
पाचही जागा महायुती जिंकणार : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या पाच जागांच्या मतदानानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "या पाचही जागा महायुती निश्चितपणे जिंकणार आहे."
हेही वाचा -
- 'आमच्या आयुष्यातील दहा वर्षे का वाया घालवली', फडणवीसांना उत्तमराव जाणकर यांचा खडा सवाल, शरद पवारांना पाठिंबा जाहीर - Uttamrao Jankar support NCP
- 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मिशन मराठवाडा'; आज नांदेडसह परभणीत घेणार प्रचारसभा - PM Narendra Modi Rally