छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Eknath Shinde On Uddhav Thackeray : महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (25 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी गुलमंडी येथे झालेल्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे अगोदर मोदींबद्दल काय बोलत होते आणि आता काय बोलताय ते बघा. आज पर्यंत अनेक सरडे पाहिले मात्र इतक्या लवकर रंग बदलणारा सरडा पहिल्यांदाच पाहिल्याची घणाघाती टीका यावेळी शिंदेंनी केली. तसंच अशा अनेक ऑडिओ क्लिप्स आपल्याकडं असल्याचंही ते म्हणाले.
मोदींना खोटं बोलण्याची गरज नाही : यावेळी बोलत असताना शिंदे म्हणाले की, "मोदींनी जाहीरनाम्यात जे बोललं ते पूर्ण केलंय, मोदींची गॅरंटी आहे. आज शरद पवार यांनी जाहीरनामा तयार केला. इतके वर्ष काय केलं, यांनी जाहीरनामा नाही तर माफीनामा तयार केला पाहिजे. आता दुसरं काही राहिलं नाही, तर ते संविधान बदलणार असा अपप्रचार करताय. पण मी सांगतो, सूर्य, चंद्र असे पर्यंत संविधान कुणी बदलणार नाही. अगोदरच्या सरकारमध्ये साधू हत्याकांड झालं, मात्र आमच्या सरकारनं आल्या आल्या जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम केलं," असंही ते म्हणाले.
संदिपान भुमरे यांनी भरला उमेदवारी अर्ज : महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीचा आपला अर्ज गुरुवारी भरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात आला. क्रांती चौक ते गुलमंडी असं जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलं. गुलमंडी येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. पंतप्रधान म्हणून 24 तास काम करणारे नरेंद्र मोदी हवेत की, आराम करायला विदेशात जाणारे राहुल गांधी पाहिजे असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
पंचनामे करण्याचे आदेश : मराठवाड्यात गारपीट आणि अतिवृष्टी झाली, त्याबाबत सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना पंचनामा करायचे आदेश दिले आहेत. जिथं नुकसान झालं तिथं पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या आहेत. जिथं पाणी टंचाई आहे, तिथं टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -