नवी दिल्ली NDA Meeting : लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून आता सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान आज राजधानी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. यावेळी सर्व खासदारांच्या संमतीनं नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आलीय. यावेळी विविध मित्रपक्षांच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यांच्या नावाला संमती दर्शवली. यावेळी संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'इंडिया' आघाडीवर सडकून टीका केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राजनाथ सिंहांच्या प्रस्तावाला आमचं अनुमोदन आहे. लोकांना भ्रमित करण्याचं आणि अफवा पसरविण्याचं काम विरोधकांकडून करण्यात आलं. मात्र त्यांना जनतेनं नाकारलं आहे. नवीन खासदारांचं अभिनंदन. शिवसेना आणि भाजपा समविचारी पक्ष आहेत. शिवसेना आणि भाजपा ही बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून फेव्हिकॉलसारखी मजबूत युती आहे. मोदींची जादू सलग तिसऱ्यांदा जनतेनं पाहिली आहे. शिवसेना पक्षाकडून त्यांचं स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत." तसंच यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसाठी एक कविता सादर केली. 'मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खिंचा है. मैं पत्थर पे लिखी इबारत हु , शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे...'
गमावलेल्या सर्व जागा एनडीए जिंकेल : तसंच यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला सहमती दर्शवताना सर्वजण मिळून काम करणार असल्याचं सांगितलं. जे काही काम शिल्लक आहे ते पंतप्रधान मोदी पूर्ण करतील. बिहारचं उर्वरित कामही पूर्ण केलं जाईल. यादरम्यान नितीश कुमार असं काही बोलले ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीही हसले. ते म्हणाले की, ''ज्यानं इथं थोडंसं जिंकलंय आणि तिथंही तुम्ही पुढच्या वेळी याल तेव्हा सर्व काही गमावेल. यावेळी त्यांनी गमावलेल्या सर्व जागा एनडीए जिंकेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या लोकांना (विरोधकांना) पुढं वाव राहणार नाही. देश आणि बिहार विकासाच्या मार्गावर पुढं जातील असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला आणि तुमची (पंतप्रधान मोदी) इच्छा असेल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला साथ देऊ, असं आश्वासन दिलं.
हेही वाचा :