अमरावती : महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं, तर महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करत ईव्हीएम तपासणी व पडताळणीची मागणी केली जात आहे. यावरुन आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
रवी राणा राजीनामा देतील : "लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमबाबत कोणाला कुठलीही शंका नव्हती. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र महाविकास महाविकास आघाडीतील सर्व नेते शंका उपस्थित करीत आहेत. ईव्हीएमद्वारेच घेतलेल्या निवडणुकीत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे विजयी झाले. ईव्हीएमवर विश्वास नाही, तर बळवंत वानखडे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा देताच रवी राणा देखील राजीनामा देतील. विरोधकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी समोर यावं," असं आव्हान नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकशाही जिवंत : "विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. लोकशाही संकटात आल्याची बोंब विरोधकांकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल लागला, त्या निकालावर आम्ही कोणीही आक्षेप घेतला नाही. आता मात्र लोकशाहीवर आक्षेप घेणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत लोकशाही जिवंत कशी होती? हे तरी स्पष्ट करावं," असं नवनीत राणा म्हणाल्या.
हेही वाचा