मुंबई: भाजपानं लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपानं सातारा येथून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून साताऱ्याचा उमेदवार जाहीर नसल्यानं जागावाटपाचा तिढा पूर्णपणं सुटला नव्हता.
उदयराजे भोसले यांनी उमदेवारी मिळाल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'उमेदवारीबाबत मला शंका नव्हती." सातारा येथून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सातारा लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत होते. मात्र, त्यांनी तुतारी चिन्हावर नव्हे तर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.
दिल्लीत ठोकला होता तळ- सातारा येथून लोकसभा उमेदवारीचे तिकिट मिळण्यासाठी उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत तळ ठोकला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचा अंदाज खरा होता. हा अंदाज आज खरा ठरला आहे. उदयनराजे यांना तिकीट वाटप होण्यापूर्वीच त्यांच्या प्रचाराला सातारा लोकसभा मतदारसंघात सुरुवात झाली आहे. दिल्लीहून उदयनराजे सातारा येथे परतल्यानंतर त्यांनी मी निवडणूक लढणारच असा निश्चय व्यक्त केला होता. अजित पवार यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारीवर दावा केला होता. त्यामुळे भाजपासह खासदार उदयनराजे भोसले यांची तिकीट वाटपात कोंडी झाली होती.
दोन्ही राजांमधील वाद संपुष्टात- आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यातील राजकीय संघर्ष सातारकरांनी अनेकदा पाहिलाय. मागील काळात अनेक कारणांनी दोन्ही राजे आणि समर्थक हे विकासकामे, निधीसह श्रेयवादावरून आमने-समोर आले होते. त्यामुळं दोन्ही गटातील संबंध काहीसे ताणलेले होते. सध्या दोघंही भाजपामध्ये आहेत. सध्या, दोघांमधील वाद संपुष्टात आला आहे. काही दिवसांपूर्वी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे थोरले चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दुपारी थेट शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊनदेखील उदयनराजेंनी भेटदेखील घेतली होती.
- राज्यातील 7 जिल्ह्यात प्रत्येकी 3 हजारांहून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात 3025 मतदान केंद्र आहेत.
हेही वाचा-