बारामती - राज्याचं असो की बारामतीचे राजकारण १९६७ पासून माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या भोवती फिरते आहे. शरद पवार यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केल्यापासून त्यांच्या अथवा त्यांच्या उमेदवाराची सांगता सभा बारामतीतील मिशन बंगला येथे होतात. यंदा राष्ट्रवादीतील फुटीनंतर मिशन बंगल्याचे मैदान अजित पवार गटाने मिळविलं आहे. त्यामुळे यंदा शरद पवारांना प्रचाराच्या शेवटच्या दिवशीची सांगता सभा या मैदानावरून करता येणार नाही. त्याऐवजी शरद पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टा येथे सांगता सभा घेणार आहेत.
गेली अनेक वर्षे मिशन बंगल्याचे मैदान आणि पवार कुटुंबीय यांचे नाते टिकून आहे. गतवर्षी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात उभी दरी निर्माण झाल्याचं चित्र आहे. ही दरी तेवढ्यावरच थांबली नाही. लोकसभा निवडणूकीत एकाच घरातून एकमेकांविरोधात उमेदवार देण्यापर्यंत ही दरी रुंदावत गेली. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणूक लढवित आहेत. कुटुंबातील महिला उमेदवार असले तरी खरी लढाई ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यात होत आहे. या दोघांचीही प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली आहे. गेली दीड महिना उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांवर टीका करत आहेत. त्या टीकेला शरद पवारांनीदेखील वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं आहे.
कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू- लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा नगरपरिषदेची निवडणूक असली तर राष्ट्रवादीनं नेहमीच मिशन बंगल्यानजीकच्या मैदानावर सांगता सभा घेत प्रचाराची सांगता केली आहे. आता बारामतीत राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू आहे. यातूनच अजित पवार गटानं शरद पवार गटाच्या अगोदरच हे मैदान बुक केले. त्यामुळे शरद पवार गटाला सांगता सभा अन्यत्र घ्यावी लागणार आहे. आता हे दोन्ही मातब्बर नेते रविवारी बारामतीत आपापल्या पक्षाची सांगता सभा घेत आहेत. त्यात ते एकमेकांबद्दल काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा-