अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी सर्व पक्षाचे उमेदवार अमेदवारी अर्ज देखील दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (29 ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस आहे.
उमेदवारी अर्ज केला दाखल : "पंचवीस वर्षांपूर्वी कार्यकर्ता हा ज्या ताकदीनं आमच्यासोबत उभा होता, त्याच आणि त्यापेक्षा दुप्पट ताकदीनं आज देखील आमच्यासोबत उभा आहे. कार्यकर्त्यांनी आमच्यासमोर कुठलंच आव्हान ठेवलेलं नाही. सगळ्यांची धूळधाण उडवून अचलपूर मतदारसंघात 'प्रहार' अतिशय ताकदीनं ठाम आहे. आता अवघ्या महाराष्ट्राचं चित्र बदलण्याची ताकद या अचलपूरच्या भूमीमध्ये आहे," असं म्हणत बच्चू कडू यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मी पाचव्यांदा येणार : "या निवडणुकीत माझा विजय हा निश्चित आहे. आता मी पाचव्यांदा निवडून येणार असून, राज्यात आम्ही पाच ते 50 करू अशी अवस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू," असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त करत विरोधकांना इशारा दिला. मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल हे निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांना सोडून शिवसेनेत गेले होते. मेळघाट विधानसभा मतदारसंघात महायुतीची जागा भाजपासाठी सुटल्यानं राजकुमार पटेल हे पुन्हा प्रहारमध्ये परतले. या संदर्भात 'कलका भुला आज वापस आया' असं बच्चू कडू म्हणाले.
विरोधक पुढच्या वर्षी अर्ज भरणार नाहीत : विरोधकांचं डिपॉझिट जप्त होण्यासंदर्भात बच्चू कडू म्हणाले, "आज आमच्या या मिरवणुकीत एकही व्यक्ती मतदारसंघाबाहेरचा आलेला नाही. या निवडणुकीत विरोधकांची अशी अवस्था होईल की, पुढच्यावेळी ते अर्जच भरणार नाहीत. चार नोव्हेंबरला मी किती मतांनी निवडून येईल, हा आकडा मी जाहीर करणार असून, त्यापेक्षा एक मत देखील मला कमी पडणार नाही."
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज : अचलपूर येथील गांधी पुलावरून बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता तहसील कार्यालयाच्या दिशेनं मिरवणूक काढली. यावेळी अचलपूर आणि चांदुर बाजार तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत प्रत्येक कार्यकर्ता हा पांढरी टोपी घालून सहभागी झाला होता.
हेही वाचा -