मुंबई Baba Siddique Resigns Congress : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आपल्या X (पुर्वीचं ट्विटर) अकाउंट वर पोस्ट करत दिलीय. काँग्रेस पक्षासाठी हा मुंबईतून दुसरा झटका म्हटलं जातंय. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.
भविष्याचं काही सांगू शकत नाही : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी आपल्या पुत्रासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याच महिन्यात सिद्दीकी पिता-पुत्रांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र यानंतर दोघा पिता पुत्रांनी माध्यमांसमोर येऊन आपण काँग्रेससोबतच असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र भविष्याबाबत सांगू शकत नसल्याचं विधान त्यांनी केलं होतं. यामुळं त्यांचा बोलण्याचा कल सर्वांच्या लक्षात आला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर बाबा सिद्दीकी केव्हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आता राजीमाना दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला सिद्दीकी पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्दीकींची 'X' पोस्ट : बाबा सिद्दिकी यांनी 'X' या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आपण किशोरवयातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी झालो होतो. तब्बल 48 वर्षात हा दीर्घ प्रवास खूप महत्त्वाचा होता. मात्र तातडीनं काँग्रेस प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. मला व्यक्त व्हायला खूप आवडलं असतं, मात्र काही गोष्टींबाबत मौन बाळगणं योग्य असल्याचं म्हणत नकळत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. माझ्या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.
सिद्दीकी पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेस पक्षातील राजकीय प्रवास हा 48 वर्षाचा आहे. ते 1999 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत. नगरसेवक, आमदार ते राज्यमंत्री अशा प्रकारची पदंही त्यांनी भूषवली आहेत. मुंबई शहरात अजित पवार गटाची ताकद नसल्यामुळं आणि अल्पसंख्यांक चेहरा अजित पवार गटाकडं नसल्यामुळं बाबा सिद्दीकी यांच्या माध्यमातून ही पोकळी भरली जाऊ शकते, अशी आशा अजित पवार गटाला आहे. त्यामुळं बाबा सिद्दीकी यांच्या रुपानं अजित पवार गटाला मुंबईतील ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
योग्य वेळेला योग्य माहिती देऊ - सुनील तटकरे : सिद्दीकी यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, "काँग्रेसमध्ये असलेली प्रचंड अस्वस्थता याचं द्योतक म्हणजे बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा म्हणता येईल. बाबा सिद्दीकी यांनी मुंबई परिसरात आपलं वर्चस्व निर्माण केलंय. काँग्रेसची माणसं हे काँग्रेस पक्षापासून का दूर जातात, याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा धक्के येत्या काळात पाहायला मिळू शकतात", असा दावाही त्यांनी केला आहे. तसंच 10 फेब्रुवारी सिद्दीकी पिता-पुत्रांच्या आपल्या पक्षात प्रवेश होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, "योग्य वेळ आल्यावर योग्य उत्तर देऊ."
बाबा सिद्दीकी गेल्यानं कोणताही धक्का नाही - विजय वडेट्टीवार : काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "त्यांना काही आश्वासन मिळत असेल. बाबा सिद्दीकी गेल्यानं कोणताही धक्का बसणार नाही. आज वडिलांनी राजीनामा दिलाय, मात्र वडिलांच्या पावलांवर मुलगा पाऊल ठेवत असतो. झिशान सिद्दीकी यांच्याबरोबर चर्चा करु."
हेही वाचा :