छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत अनेक मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. "जिल्ह्यासाठी सरकारनं मोठा निधी दिल्यानं अनेक विकास कामे करणं शक्य झालं. त्यात रस्त्याचा प्रश्न, पाण्याची अर्धवट राहिलेली योजना यासाठी कामे झाल्यानं त्याच्या जोरावर मतदार नक्की पाठीशी राहतील," असा विश्वास, त्यांनी व्यक्त केला. तर 'एमआयएम' पक्षाशी आमची खरी लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी अतुल सावे यांच्यासोबत खास संवाद साधला.
आमचा विरोधक एकच : "जिल्ह्यात मागील काही निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांना विजय मिळत आला. मात्र, यंदा शिवसेनेचे दोन गट झाल्यानं भाजपाला मिळणारा पाठिंबा देखील विभागला जाणार आहे. मात्र, त्याचा भाजपाला परिणाम होणार नाही. आमची लढाई फक्त आणि फक्त 'एमआयएम' पक्षाबरोबर आहे. हा जातीवादी पक्ष आहे. याधीही आम्ही 2014 आणि 2019 मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढलो आहोत. यंदा देखील मतदार त्या जातीवादी पक्षाला मतदान न करता विकासकाम केल्यानं आम्हाला मतदान करतील," असा विश्वास व्यक्त करत अतुल सावे यांनी 'एमआयएम'वर टीका केली.
विकास कामांच्या जोरावर निवडणूक जिंकणार : भाजपा नेते अतुल सावे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे लहू शेवाळे, एमआयएम पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, समाजवादी पक्षाचे गफार कादरी हे दिग्गज उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. "निवडणूक लढवताना सरकारनं केलेल्या विकास कामाच्या जोरावर जिंकून येणार," असा विश्वास, अतुल सावे यांनी व्यक्त केला.
शहराच्या विकासात योगदान : "रस्त्यांसाठी सरकारनं 374 कोटी तर स्मार्ट सिटीमधून 300 कोटींचा निधी दिला, तर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 1680 कोटींची योजना मंजूर केली. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर या योजनेला एकही पैसा दिला नाही. मात्र, नंतर सरकार बदलल्यानं पुन्हा एकदा निधी मंजूर झाला. तीन ते चार महिन्यांमध्ये नागरिकांना पाणी मिळणार आहे. तर पूर्व मतदारसंघात 196 कोटी खर्च करून ड्रेनेज कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं शहराच्या विकासात योगदान असल्यानं जनता मत देईल," असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला.
रोजगार निर्मिती वाढली : "राज्यातील उद्योग इतरत्र पळवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, जिल्ह्यात अनेक नवनवीन उद्योग आणण्यात सरकारला यश मिळालं. ऐतिहासिक ओळख असलेल्या शहराला औद्योगिक ओळख देखील मिळत आहे. शेंद्रा परिसरात अथर इलेक्ट्रिक, किर्लोस्करसारख्या मोठ्या उद्योगांना मान्यता मिळाली. मोठी गुंतवणूक तर होत आहे, शिवाय रोजगार निर्माण होणार असल्यानं मोठा दिलासा या भागातील युवकांना मिळणार आहे. अनेक प्रकल्प शहरात दाखल होतील," असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -