मुंबई Ashok Chavhan Resigns : लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्याआधी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षालाही खिंडार पडताना दिसतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावरुन अनेक आरोप प्रत्यारोप होत असून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
चव्हाण गेले म्हणून मी जाईन यात तथ्य नाही - विजय वडेट्टीवार : अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी काही आमदार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचंही नाव असून यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, "अशोकराव चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक असून त्यांनी अचानक का निर्णय घेतला हे आपल्याला ठाऊक नाही. त्यांची माझ्याशी चर्चा झाली नाही. मी 2007 पासून त्यांच्या बरोबर काम केलं आहे. म्हणून कदाचित चर्चा होते ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार जातील, पण त्यात तथ्य नाही."
अशोकराव चव्हाणांच्या राजीनाम्यानं वेदना - विश्वजीत कदम : अशोकराव चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडीवर विश्वजीत कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. विश्वजीत कदम म्हणाले, "आज सकाळपासून धक्कादायक बातमी समजली. अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिलाय. याच बातमीवरुन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वेदना झाल्या आहेत. मी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. मी अजूनही काम करतोय. पलूस कडेगावच्या माता भगिनींनी मला काम करण्याची संधी दिलीय. त्यांना विश्वासात न घेता मी कोणताही निर्णय घेणार नाही."
ब्लॅकमेलिंग करून राजीनामा द्यायला भाग पाडले- "भाजपानं कितीही फोडाफोडीचे राजकारण अथवा दबाव टाकून नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता भाजप आणि गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितपणे धडा शिकवेल. भाजपाला महाराष्ट्रात अजिबात थारा नाही", असे आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. "केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे, हे स्पष्ट होते. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दबाव होता. मात्र अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून राजीनामा द्यायला भाग पाडले. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने डाव खेळत आहे. काही समस्यांमध्ये आणि प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी निश्चितच आपल्याकडे दबाव टाकून ईडीसीबीआय या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात घेऊ शकते. मात्र तमाम जनता जनार्दनाला ही बाब निश्चितच रुजणारी नाही", असे देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
कुठतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न - "राज्याची जाण असणाऱ्या मोठ्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या अशोक चव्हाण यांनीही काँग्रेस पक्षाशी फारकत घेतली आहे. राज्याचे माजी काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्दैवी आहे. मात्र यापुढे राज्य आणि देशातील तरुणाई काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जात आहे. राष्ट्रीय काँग्रेस एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करणार" असल्याचं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, "मी सकाळपासून 20 ते 22 आमदारांशी बोललो आहे. राज्यातील काँग्रेस आमदार भारतीय जनता पक्षासोबत जाणार यात काही तथ्य नाही. राज्यात काँग्रेसला चांगलं वातावरण आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन लढू असं आमदारांचं म्हणणं आहे. काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असा सर्व्हे आला. त्यामुळे कुठतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या जनतेचा मूड महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते हा झेंडा समर्थपणे पुढे घेऊन जाणार आहोत.
काँग्रेसनंतर पुढे काय : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नाराज असल्याचं बोललं जात होतं. यापूर्वी अनेकवेळा अशोकराव चव्हाण हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, यासंदर्भात अशोकराव चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत आपण काँग्रेसमध्ये असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता अशोकराव चव्हाण भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हेही वाचा :