मुंबई Ashok Chavan Join BJP : अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज (13 फेब्रुवारी) भाजपामध्ये प्रवेश केलाय. भाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केलाय. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
नव्यानं सुरुवात करतोय : "सर्व प्रथम भाजपामधील सर्व प्रमुख नेत्यांचं आभार मानतो. कारण विकासात्मक कामामध्ये आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. गेल्या ३८ वर्षाचा राजकीय प्रवासात आज मी नव्यानं सुरुवात करतोय. देशाच्या विकासात आपलीसुद्धा महत्त्वाची भूमिका असावी या इच्छेनं मी भाजपामध्ये प्रवेश केलाय," अशी भावना भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केली.
विकासासाठी काम करणार : अशोक चव्हाण हे अधिकृत भाजपामध्ये दाखल झाले आहेत. "माझ्या राजकीय करियरची आजपासून नवीन सुरुवात होतेय. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करू," अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती. या पक्ष प्रवेशावेळी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांच्या मुलीला विधानसभेची उमेदवारी? : अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची मुलगी श्रीजया यांना विधानसभेवर घेण्याचा प्लॅन भाजपाकडून तयार झाला असल्याची माहिती मिळत आहे. तसंच राज्यात भाजपाचं सरकार आल्यास श्रीजया यांना मंत्रीपदही मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
काँग्रेस पक्षाला दिली सोडचिठ्ठी : अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसची साथ सोडली होती. चव्हाण यांचे वडील, माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी राज्यात काँग्रेस वाढवली होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अशोक चव्हाण यांनीही काँग्रेससाठी अहोरात्र काम केलं. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केलाय. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय.
हेही वाचा -