मुंबई Ashok Chavan Join BJP : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. 38 वर्षांच्या काँग्रेस सोबतच्या राजकीय प्रवासानंतर अशोकराव चव्हाण यांनी रीतसर अधिकृतपणे भाजपा सदस्यत्वाची 5 रुपये फी भरून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी 20 रुपयाची नोट दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
20 रुपयाची नोट दिली परंतु 15 रुपये घेतले नाहीत : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडवणीस यांनी, आगे आगे देखो, होता है क्या! असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्याची प्रचिती आज लगेच आली. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर भाजपामध्ये आज अधिकृतरित्या प्रवेश केला. या पक्षप्रवेशादरम्यान त्यांनी भाजपाची सदस्यत्वाची अधिकृत पाच रुपये फी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आणि बावनकुळे यांनी अशोकराव चव्हाण यांच्या नावाची रीतसर पावती त्यांना दिली. यासाठी चव्हाण यांनी 20 रुपयाची नोट बावनकुळे यांच्या हाती दिली होती. अशोकराव चव्हाण आणि भर पत्रकार परिषदेमध्ये सर्वांसमोर 20 रुपयांची नोट बावनकुळे यांच्याकडं दिली. परंतु भाजपा सदस्यत्वाची 5 रुपये फी आहे. मात्र उर्वरित 15 रुपये बावनकुळे यांनी त्यांना परत दिले नाहीत. त्यामुळं उरलेल्या 15 रुपयात अशोकराव चव्हाण यांनी अजून तीन सदस्यांची फी आगाऊ भरली आहे का? अशी मिश्किल चर्चा यावेळी रंगली होती.
विकास कामांवर जास्त भर : या पक्षप्रवेशानंतर बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'सबका साथ सबका विकास' या उद्देशानं जी काही लोकाभिमुख कामं करताय त्यांनी मी प्रेरित झालोय. नेहमी सरसकट सर्वच गोष्टींना विरोध करायचा नसतो. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे. माझ्या संपूर्ण आयुष्यात राजकारण करताना मी विकास कामांवर जास्त भर दिला आहे. आज मी 38 वर्षांची काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश करत असताना माझी नवीन सुरुवात होत आहे. हा माझा व्यक्तिगत निर्णय असून मी कुणालाही माझ्यासोबत यायला सांगितलेलं नाही. त्यासोबत मी अधिकृतपणे भाजपा सदस्यत्वाची फी भरून त्याची पावती घेऊन रीतसर भाजपामध्ये प्रवेश केलाय."
आशिष शेलार यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा उल्लेख : अशोकराव चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशादरम्यान पत्रकार परिषदेत बोलत असताना अशोक चव्हाण थोडेसे गोंधळलेले दिसून आले. भाजपाच्या नेत्यांचा परिचय करून देत असताना भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष असा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावर आपली बाजू सावरत आजचा पहिलाच दिवस असून मी नवखा असल्यानं असे प्रसंग होत राहणार असंही बोलायला चव्हाण विसरले नाहीत.
हेही वाचा -