मुंबई : माहिम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडं शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. तसंच शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही महेश सावंत यांना उमेदवारी दिली. त्यामुळं या मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरेंचे पुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांचा त्यांना पाठिंबा देण्याचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात राज्यात महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळं लोकसभेत मनसेनं एकही उमेदवार उभा केला नाही. त्यात आता विधानसभेत तेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी उ़डी घेतली आहे. त्यामुळं त्या माहिम मतदारसंघात महायुती मनसेला पाठिंबा देईल का? याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, तेथील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी या संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
समर्थन देण्याची भूमिका - आशिष शेलार : माहिममध्ये अमित ठाकरे यांना महायुती पाठिंबा देणार का? याबाबत भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरेंबद्दल नातं वाटत नसेल, पण महायुतीला अशा नात्यागोत्याविषयी फार काही वाटतं. अमित ठाकरे पहिलीच निवडणूक लढवत असतील, तर त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विनंती करणार आहे. त्यानंतर ते निर्णय घेतील. महायुतीत कुठलाही मतभेद नाही, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपता येईल, असं नातं आपण दाखवलं पाहिजेत. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाहीच. ते महायुतीचे उमेदवार आहेत."
अर्ज भरणार - सरवणकर : आशिष शेलार यांच्या भूमिकेनंतर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली. "आशिष शेलार आणि राज ठाकरे हे एक चांगले मित्र आहेत. आशिष शेलार यांनी मैत्रीसाठी काही विधान केलं असेल तर ते त्यांचं स्वतंत्र मत आहे. मी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे. दीपक केसरकर यांनी कोणतीही विनंती केली नाही. तसंच माझ्यावर कोणाचाही दबाव नाही."
राज ठाकरे, आशिष शेलार यांची मैत्री : आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. शेलार आणि राज ठाकरे यांची पक्षापलिकडची मैत्री अनेकदा पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आशिष शेलार अनेकदा जाताना दिसतात. त्यामुळं त्यांचा कौटुंबिक स्नेह आहे. त्यामुळे 'घरातला मुलगा' असा उल्लेख करत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचं आवाहन शेलारांनी केलं आहे.
हेही वाचा -