मुंबई Lok Sabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि ॲड उज्वल निकम या तीन उमेदवारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतलीय. यांचा अजूनही मतदारांवर प्रभाव असल्यामुळंच ठाकरे आडनाव असलेल्या राज यांना महायुतीच्या नेत्यांनी भेटायला पसंती दिली आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केल्या आहेत.
महायुतीचे नेते 'राज'दरबारी : महायुतीनं अत्यंत प्रतीक्षेनंतर शेवटच्या क्षणी ठाण्यातून नरेश म्हस्के तर कल्याणमधून डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली तर मुंबई उत्तर मध्य मधून ज्येष्ठ सरकारी वकील अँड. उज्वल निकम यांची भाजपा तर्फे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. उमेदवारांच्या नावाची घोषणा होताच या उमेदवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. उमेदवारी घोषित होताच राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्यामागची महायुतीच्या या तीन उमेदवारांची नेमकी काय कारणे आहेत, याबाबत राजकीय जाणकारांच्या प्रतिक्रिया ई टीव्हीनं जाणून घेतल्या.
राज ठाकरे यांची आजही ताकद : यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या नावाला आजही वलय आहे. राज ठाकरे यांचा करिष्मा आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांची महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये चांगली ताकद आहे. राज ठाकरे हे खूप चांगले वक्ते आहेत. त्यामुळं ते जेव्हा प्रचारात उतरतील तेव्हा निश्चितच त्याचा फायदा उमेदवाराला होऊ शकतो. राज ठाकरे यांच्यासारखा नेता सोबत असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते म्हणूनच राज ठाकरे यांची आमच्या उमेदवारांनी भेट घेतलीय. यात काहीही गैर नसून राज ठाकरे हे निश्चितच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतील आणि उमेदवार निवडून आणतील, असंही वाघमारे म्हणाले.
महायुतीच्या व्यासपीठावर ठाकरे हवेत : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, राज ठाकरे यांची मुंबई परिसरात अडीच ते तीन लाखापेक्षा अधिक मतं आहेत. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तरुणांमध्ये अजूनही राज ठाकरे यांची क्रेझ आहे. त्यामुळं राज ठाकरे हे आपल्या सोबत प्रचाराला यावेत, अशी महायुतीच्या उमेदवारांची इच्छा आहे. म्हणूनच महायुतीचे उमेदवार उमेदवारी घोषित होताच थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी आणि त्यामुळं लोकांमध्ये होणारी चर्चा ही महत्त्वाची आहे. त्याचं मतांमध्ये किती रुपांतर होते हा जरी नंतरचा मुद्दा असला तरी महायुती सोबत शिवसेना होती. मात्र, ठाकरे नव्हते. आता महायुती सोबत शिवसेनाही आहे आणि राज ठाकरे यांच्या रुपानं एक ठाकरे सुद्धा आहे. म्हणूनच महायुतीतील नेते आणि उमेदवार हे राज ठाकरे यांच्या दरबारी हजेरी लावत असल्याचंही, जोशी म्हणाले.
हेही वाचा :