नागपूर Anil Deshmukh News : पुण्यातील शिवाजीनगर भागातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
दोषींवर कठोर कारवाई करावी : पुणे ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया देत अनिल देशमुख म्हणाले की, "पुण्यात वारंवार ड्रग्ज प्रकरण घडत आहे. ललित पाटील प्रकरण ताजं असताना आता हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ड्रग्ज विकले जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शासनानं तिथं लक्ष दिलं पाहिजे. एक-दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. जे अधिकारी यात दोषी आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सांस्कृतिकनगरी पुण्यात अशा घटना वारंवार होणं योग्य नाही. या घटनांमुळं पुण्याची ओळख पुसली जात आहे."
हिट अँड रनच्या घटनेत वाढ : हिट अँड रनच्या घटनांवरुन ते म्हणाले की, "महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हिट अँड रनच्या घटना घडत आहे. नागपूरच्या राम झुलावरील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालू या गेल्या 130 दिवसांपासून फरार असून आहे. त्याला राजकीय संरक्षण दिलं जात असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळं वाहतूक पोलीस संख्या वाढवली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांचे अनेक पद रिक्त आहेत. त्यामुळं भरती प्रक्रिया गतिमान केली पाहिजे", असं देशमुख म्हणाले.
दबावात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार करणार : पुढं ते म्हणाले, "राज्यात अनेक अधिकारी सरकारच्या दबावात नियमबाह्य काम करत आहेत. सध्याचं सरकार केवळ तीन महिनेच राहणार आहे. त्यानंतर आमचंच सरकार येणार आहे. दबावात नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या याद्या आम्ही तयार करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यासाठी अशा याद्या तयार करणार आहोत." पुढं नीट परीक्षेच्या गोंधळावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, "23 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सध्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर सुरुवातीला असं काही घडलच नाही, असं जाहीर केलं होतं. सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. जो कोणी नीट पेपरफुटी प्रकरणात सहभागी असेल, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे."
हेही वाचा -