मुंबई Anil Deshmukh Press Conference : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री देशमुखांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच या वादात समित कदम यांनी उडी घेतली. त्यांनी अनिल देशमुख यांचे आरोप फेटाळले. या सर्व पार्श्वभूमीवर आज (29 जुलै) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपानं दबाव टाकल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनीही या आरोपाला दुजोरा देत समित कदमला आपल्याकडं प्रतिज्ञापत्र घेऊन पाठवण्यात आल्याचं सांगितलं. तसंच यासंदर्भात आपल्याकडं पुरावा असल्याचंही ते म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांवर असा कोणताही दबाव आणला नसल्याचं स्पष्ट केलं.
काय म्हणाले अनिल देशमुख? : यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, "तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडं प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदमलाच पाठवलं होतं. त्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं की, मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांसह इतर नेत्यांवर खोटे आरोप करायचे. त्या प्रतिज्ञापत्रावर माझी सही घेण्यासाठी समित कदमला पाठवण्यात आलं होतं. तसंच यावेळी त्यांनी फडणवीस आणि समित कदम यांचे सोबतचे फोटोही दाखवले." पुढं ते म्हणाले की, समित कदम हा साधा नगरसेवकही नाही. तरी फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली. यामागचं कारण काय?" असा सवाल देशमुखांनी केला.
...तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जेलमध्ये असते : पुढं ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रावर जर मी सही केली असती तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते. खोट्या आरोपांखाली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये टाकलं असतं. अशा पद्धतीनं त्यांनी घाणेरडं राजकारण केलं." तसंच 'एक तो जेल मैं जावो, नाहीतर बीजेपी मैं आओ' अशा प्रकारचं यांचं धोरण असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी भाजपावर केला. "त्याचाच एक भाग म्हणून पहिला प्रयोग माझ्यावर केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्यांनी दुसरा प्रयोग एकनाथ शिंदे यांच्यावर केला. तो प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी तिसरा प्रयोग अजित पवारांवर केला. तो देखील यशस्वी झाला. पण माझ्यावर केलेला प्रयोग तीन वर्षांपूर्वी यशस्वी झाला असता तर तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं असतं," असा दावा देखील अनिल देशमुख यांनी केला.
हेही वाचा -
- "...त्याचवेळी फडणवीसांवर एफआयआर का नाही केला?" चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना सवाल - Chandrashekhar Bawankule
- सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…; श्याम मानव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी - पाहा व्हिडिओ - Shyam Manav On Devendra Fadnavis
- नियमबाह्य काम करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यांची यादी तयार करणार, अनिल देशमुख यांचा इशारा - ANIL DESHMUKH News