अमरावती Amravati Lok Sabha Election : बहुचर्चित अशा अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Constituency) नवा ट्विस्ट आलाय. भाजपाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात महायुतीमध्ये असणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार पक्षानं उघड बंडखोरी करत महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. प्रहार पक्षाचे मेळघाट येथील आमदार राजकुमार पटेल यांनी आज (29 मार्च) पत्रकार परिषद घेत दिनेश बुब यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.
काय म्हणाले दिनेश बुब : पत्रकार परिषदेत बोलत असताना दिनेश बुब म्हणाले की, "अमरावती लोकसभा मतदारसंघात नेमकं काय सुरू आहे हे जिल्ह्यातील प्रत्येकाला ठाऊक आहे. नवनीत राणा यांना सर्वच पक्षातील नेत्यांचा विरोध आहे. मात्र, अनेक पक्षातील मंडळी उघडपणे राणांना विरोध करु शकत नाही. त्यांनी आपलं राजकीय अस्तित्व जपायलाच हवं. तसंच ही सर्व मंडळी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बसून माझं काम करणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रहार आणि शिवसेना वेगळी नाही : पुढं ते म्हणाले की, "आमदार बच्चू कडू हे मुळात शिवसैनिक होते. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी प्रहार पक्ष स्थापन केला. यामुळं शिवसेना आणि प्रहार यांच्या विचारसरणीत फारसं अंतर नाही. शिवसेना आणि प्रहार हे दोन्ही एक सारखेच पक्ष आहेत. त्यामुळं माझ्यावर शिवसेनेचा कुठलाही दबाव न येता मी प्रहार पक्षातून उमेदवारी लढवत आहे. जर उद्धव ठाकरे यांनी मला राजीनामा मागितला तर माझी राजीनामा देण्याची देखील तयारी आहे. मात्र, माझे विचार हे कायम शिवसैनिक म्हणूनच राहतील." तसंच मी एक शिवसैनिक आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान हातात भगवा झेंडा घेऊनच मी मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. आमच्या कपाळावर कायम भगवा टिळा आहे. हा भगवा टिळा लावूनच निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचंही दिनेश बुब म्हणाले.
हेही वाचा -
- अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात; "नवनीत राणांचा गेम करणार" - Amravati Lok Sabha Constituency
- अडसूळ, कडू यांचा विरोध असतानाही भाजपाकडून नवनीत राणांचं तोंड गोड - Amravati Constituency War
- अमरावती लोकसभा निवडणूक : आमच्या समोर सर्व पर्याय खुले; अभिजीत अडसूळ यांचा गर्भित इशारा - Amravati Lok Sabha Elections